कल्याणमध्ये ‘तिन तलाक’ प्रकरण; पतीसह सासूसासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली – पत्नीला त्रास देत अखेर ‘तिन तलाक’ उच्चारून घराबाहेर काढणाऱ्या नवी मुंबईतील पतीविरोधात, तसेच सासू-सासऱ्यांविरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील पत्रीपूल परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय पीडित महिलेचा विवाह जून २०२१ मध्ये वाशी सेक्टर-१ येथे राहणाऱ्या व किरकोळ फळ-भाजी व्यापाऱ्याच्या मुलाशी झाला होता. शादीडॉट कॉमवरील नोंदणीच्या आधारे हा विवाह जुळवण्यात आला होता.
विवाहानंतर अवघ्या महिनाभरातच पती आणि सासू-सासऱ्यांकडून महिलेचा छळ सुरू झाला. “तु घरात सून नाही, मोलकरीण म्हणून आली आहेस” अशा शब्दांत तिला हिणवण्यात येत होते. विवाहात पुरेसा ऐवज दिला नसल्याचा आरोप करून शिवीगाळ, मारहाण, मानसिक छळ करण्यात येत असल्याची तक्रार महिलेनं दिली. पती घर सोडून जात असे, तर पती-वडिलांतील वादाचे खापरही तिच्यावर फोडले जात असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
गर्भावस्थेदरम्यानही कोणतीही वैद्यकीय मदत न देणं, प्रसूतीनंतर माहेरहून सासरी नेण्यास टाळाटाळ करणं, जबरदस्तीने घटस्फोटावर दबाव टाकणं, अशा विविध प्रकारच्या त्रासाची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. याचदरम्यान तिला मुस्लिम व्यक्तिगत न्यायालयाकडून तलाकसंदर्भात नोटीसही पाठवण्यात आली होती.
अखेर एका रात्री पतीने घरात भांडणास सुरुवात करून शिवीगाळ-मारहाण केली व महिलेनं घर सोडावं असा आग्रह धरला. महिला नकार देताच पतीने तिच्यासमोर तिन वेळा ‘तलाक’ उच्चारला आणि सासूसासऱ्यांच्या मदतीने तिला घराबाहेर हाकलून दिलं. सध्या महिला कल्याणमधील माहेरी राहात असून तिच्या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. टिळकनगर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.