धारावीतील दुर्दैवी घटना; कोल्हापूरहून परतलेल्या २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई – धारावी परिसरात एका २६ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली. मृताचे नाव विकाश गणेश कुंजिकुर्वे (वय २६) असे असून तो धारावी ट्रांझिट कॅम्प, ब्लॉक क्रमांक ८ येथे वास्तव्यास होता.
मिळालेल्या माहितीनुसार, विकाश खासगी नोकरी करत होता आणि सुमारे पाच महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. काही दिवसांपूर्वी तो आपल्या मूळ गावी कोल्हापूर येथे गेला होता. चार दिवस तिथे राहिल्यानंतर तो बुधवारी सकाळी सुमारे सात वाजता मुंबईत परतला.
घरी आल्यानंतर थोड्याच वेळात त्याने कुटुंबीयांशी भेट घेतली आणि आपल्या ग्राउंड फ्लोअरवरील खोलीत गेला. काही वेळानंतर कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला असता प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडला. आत पाहिले असता विकाशने लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले.
कुटुंबीयांनी त्याला तात्काळ खाली उतरवून सायन रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
या प्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद (ADR) करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. धारावीतील या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.