दिवसा घरफोडी करून अग्निशस्त्र, काडतुसे आणि चांदीचे दागिने चोरणारे आरोपी मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई – मालाड (पूर्व) येथील सीओडी आर्मी कॅम्प परिसरात दिवसा घरफोडी करून अग्निशस्त्र, जिवंत काडतुसे, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरी करणाऱ्या टोळीला मुंबई गुन्हे शाखा कक्ष-१२च्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
ही घटना १ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी घडली होती. बंद घराचे कडीकोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. या प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९९/२०२५ भादंवि कलम ३०५(अ), ३३१(३) बी.एन.एस. अंतर्गत नोंद करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखा कक्ष-१२ ने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी संशयितांचा माग काढला. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दोन आरोपी तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून एक अग्निशस्त्र, नऊ जिवंत काडतुसे आणि सुमारे ४८० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी दिंडोशी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून विधी संघर्षग्रस्त बालकास त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील तपास दिंडोशी पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) श्री. विशाल ठाकूर, तसेच मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-उत्तर) श्री. प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस यांच्या नेतृत्वाखाली पो.नि. बाळासाहेब राऊत, सपोनि विजय रासकर, समीर मुजावर, युवराज चव्हाण, पोउनि अजय सावंत, सफौ अलताफ खान, सुनिल चव्हाण, बाळकृष्ण लिम्हण, पोह कल्पेश सावंत, संतोष राणे, संतोष बने, समृध्दी गोसावी, अनंत मोरे, शैलेश बिचकर, नितीन पवार, विशाल गोमे, विजय पवार, प्रसाद गोरुले, हरिचंद्र भोसले, शैलेश सोनावणे, गणेश शिंदे, अर्पिता पडवळ, पोशि चंद्रकांत शिरसाठ, अरूण धोत्रे, आणि विपूल ढाके यांनी पार पाडली.