सायन-कोळीवाडा येथे भव्य “वंदे मातरम्” रॅलीचे आयोजन; देशभक्तीचा जल्लोष
सुधाकर नाडार / वार्ताहर
मुंबई : “वंदे मातरम्” या राष्ट्रभावनेने ओतप्रोत गीताच्या १५० गौरवशाली वर्षांच्या निमित्ताने भाजप सायन-कोळीवाडा विधानसभा क्षेत्राचे आमदार तमिळ सेल्वन यांच्या पुढाकाराने भव्य आणि ऐतिहासिक “वंदे मातरम्” रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, भाजप उपाध्यक्ष रवी राजा, तसेच सुमारे ३०० शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी, भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक असे सुमारे ३ हजार सहभागी या रॅलीत उत्साहाने सहभागी झाले.
देशभक्तीच्या घोषणांनी गुंजणारी ही रॅली सायन किल्ल्यापासून सुरुवात होऊन सायन सर्कल, सायन हॉस्पिटल, माटुंगा सर्कल आणि माटुंगा फ्लॉवर मार्केट मार्गे नप्पू गार्डन येथे संपन्न झाली. “वंदे मातरम्” आणि “भारत माता की जय”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला.
रॅलीच्या माध्यमातून युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय एकता आणि सांस्कृतिक अभिमान यांची भावना अधिक दृढ झाली. या वेळी आमदार तमिळ सेल्वन म्हणाले, “‘वंदे मातरम्’ हे केवळ गीत नाही, तर ते भारताच्या आत्म्याचे प्रतीक आहे. या रॅलीचा उद्देश नव्या पिढीत देशप्रेमाची ज्योत अधिक तेजस्वी करणे हा आहे.”
या उपक्रमामुळे संपूर्ण सायन-कोळीवाडा परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला आणि रस्ते “वंदे मातरम्”च्या जयघोषाने भारावून गेले.