ठक्कर बाप्पा कॉलनीत सार्वजनिक शौचालयावरून वाद पेटला; पाडा क्रमांक ६ मधील नागरिकांचा संताप
रवि निषाद / मुंबई

मुंबई – कुर्ल्यातील नेहरू नगर परिसरातील ठक्कर बाप्पा कॉलनीत पाडा क्रमांक ६ मधील सार्वजनिक शौचालयावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आहे. या शौचालयाच्या जागेवर नवीन शौचालय बांधण्यास मुंबई महापालिकेने सर्व अटी-शर्तींसह मंजुरी दिली असून, त्यावर स्थानिकांमध्ये मतभेद उफाळले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शौचालयाच्या शेजारील मोकळ्या जागेवर नवीन बांधकाम करण्याच्या निर्णयाचा काही स्थानिकांनी विरोध केला आहे. त्यांचा असा आग्रह आहे की, गेल्या १५ वर्षांपासून पडीक अवस्थेत असलेले आणि सध्या कचराकुंडी बनलेले जुने शौचालय पाडून त्या जागेचे सुशोभीकरण करून “सम्मान स्थळ” उभारावे.
तर दुसऱ्या बाजूला काही नागरिकांचा असा दावा आहे की, ठक्कर बाप्पा कॉलनीत आधीपासूनच ६ शीटर आणि ५२ शीटर अशी दोन शौचालये कार्यरत आहेत. त्यामुळे नवीन शौचालयाची गरज नाही, आणि मोकळ्या जागेचा वापर समाजोपयोगी उद्देशाने करावा.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही स्थानिक आपापल्या हितसंबंधांसाठी या निर्णयाचा विरोध करत असल्याची चर्चा आहे, तर काहीजण मात्र परिसरातील शौचालय सुविधांच्या कमतरतेकडे लक्ष वेधत आहेत.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संबंधित विभागांकडे आपल्या तक्रारी आणि मागण्या लेखी स्वरूपात सादर केल्या असून, मनपा प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.