मला मारण्यासाठी धनंजय मुंडे यांचा मोठा डाव; अडीच कोटींची सुपारी दिल्याचा दावा, मनोज जरांगेंनी पत्रकार परिषदेत थेट घेतले नाव
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची तक्रार काल जालना पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यावरून एकच खळबळ उडाली होती. यापूर्वी लॉरेन्श बिश्नोई गँगकडून त्यांच्या जीविताला धोका असल्याचा दावा करण्यात येत होता. पण शुक्रवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे हे आपली हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यासाठी अडीच कोटींची सुपारी दिल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
धनंजय मुंडे यांनी आपल्याला मारण्यासाठी मोठा कट रचल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. ज्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांचे आणि धनंजय मुंडे यांच्या भेटी झाल्या आहेत. तर आपल्या हत्येचा कट उधळण्याअगोदरच १२ वाजता आरोपी आणि धनंजय मुंडे यांचे बोलणे झाल्याचा आरोप त्यांनी केला. बीडमध्ये आरोपी आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. घातपात करण्याचा सामुहिक कट धनंजय मुंडे यांनी केला आहे. धनंजय हे या कटाचे मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. त्यांची चौकशी करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
तर छत्रपती संभाजीनगर जवळ एका ठिकाणी धनंजय मुंडे या आरोपींची वाट पाहत उभे होते. तिथे आरोपींची त्यांची भेट झाली. त्याठिकाणी मग मुंडे यांनी आपल्याला मारण्यासाठी गोळ्या देण्यास सांगितल्याचा दावा जरांगे यांनी केला. तर आपल्या वाहनाला दुसऱ्या वाहनाची धडक देण्याची योजना पण असल्याचा दावा जरांगेंनी केला. मुंडे यांचे हे नपूंसक चाळे आहे. त्यांनी थेट येऊन भिडायला हवे होते असा आव्हान त्यांनी दिले. त्यांनी यावेळी मुंडेंवर अनेक गंभीर आरोप केले.
राज्यातील अनेक नेत्यांना धनंजय मुंडे आणि त्यांच्या टोळीचा धोका असल्याचे जरांगे म्हणाले. सध्या हे प्रकरण पोलिसांकडे असल्याने त्याविषयी जास्त खुलासा करू शकत नसल्याचा दावा जरांगे यांनी केला. मंत्री पंकजा मुंडे, आमदास सुरेश धस, बीड जिल्ह्यातील काही नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाचा, यांच्याविषयीचे कॉल रेकॉर्ड आपल्याकडे असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला. तर वंजारी समाजातील काही अधिकारी, ओएसडी यांना हाताशी धरून धनंजय मुंडे काही नेत्यांविरोधात कट रचत असल्याचे सूतोवाच जरांगे पाटील यांनी केले.
बीडमध्ये वाहनातील आसनाखाली फोन लपून ठेवण्यात येतो. त्यातून अनेक नेत्यांविरोधातील षडयंत्र बाहेर आल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला. अनेक नेत्यांच्या वाहनांमधील आसनाखाली असे फोन लपविले जातात. त्यांचे गुपीतं ऐकल्या जातात. तर काहींच्या घरात ही कॅमेरा लपविल्याचा आरोप त्यांनी केला. यामाध्यमातून काही नेत्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे संकेत त्यांनी दिले.