८३ कोटींच्या ऑनलाईन फ्रॉडचा पर्दाफाश,१२ जणांना अटक; मुख्य सूत्रधाराला बेलापूर येथून अटक
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून देशभरात सायबर फसवणूक करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर विविध राज्यांतील शेकडो लोकांना फसवणुकीच्या जाळ्यात ओढून तब्बल ८३.९७ कोटी रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडे असलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या तपासाच्या माहितीनुसार, ही टोळी ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली बेकायदेशीर बेटिंग आणि सायबर फसवणुकीचे जाळे देशभर पसरवत होती. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, व्हाट्सएप्प आणि टेलीग्राम ग्रुपच्या माध्यमातून “गेम खेळून पैसे दुप्पट मिळवा”, “फक्त नशीब आजमवा आणि कमवा” अशा आमिषाच्या जाहिराती देऊन, टोळी सामान्य नागरिकांना आमिषं दाखवत होती. लोकांनी या आमिषाला बळी पडून लोकांनी एप डाउनलोड करत पैसे जमा केले. पण त्यानंतर ऑनलाईन गेमिंगचा खेळ थांबवला जायचा आणि अकाउंट ब्लॉक केले जायचे. त्यानंतर सर्व रक्कमे खात्यातून काढली जायची. या माध्यमातून आरोपींनी ८८६ वेगवेगळ्या बँक खात्यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात व्यवहार केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
या रॅकेटचा मुख्य सूत्रधार इम्रान उस्मानी मिनहाज शेख (३२) याला पोलिसांनी सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशन परिसरातून अटक केली. इम्रान हा फसवणुकीसाठी बोगस बँक खाते उघडण्यासाठी नागरिकांकडून त्यांच्या पासबुक, एटीएम कार्ड आणि मोबाइल सिमकार्ड्स गोळा करून ठेवत असे. त्यानंतर ही माहिती तो इतर साथीदारांना देत असे, जे या खात्यांतून व्यवहार करून पैसे परदेशी खात्यांमध्ये ट्रान्सफर करत असत.
इम्रानच्या अटकेनंतर पोलिसांनी डोंबिवली आणि पुणावळे (पिंपरी-चिंचवड) या भागांतील विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत आणखी ६ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या संगणकांमधून आणि मोबाईलमधून सायबर व्यवहारांचे पुरावे पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यानंतर केलेल्या तपासात आणखी ५ साथीदारांची ओळख पटवून त्यांनाही अटक करण्यात आली.
पोलिसांनी आरोपींकडून ५२ मोबाईल फोन, ७ लॅपटॉप, ९९ डेबिट कार्ड, ६४ पासबुक, १ टाटा सफारी स्टॉर्म वाहन, असा १८.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम , महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, ऑनलाईन गेमिंग प्रतिबंधक अधिनियम २०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तपास अधिकारी इम्रान आणि त्याच्या साथीदारांनी फसवणुकीचे पैसे कुठे गुंतवले, परदेशी खात्यांशी काही संबंध आहेत का, याचा शोध घेत आहेत.