मुंबईत लोकलने ४ प्रवाशांना उडवलं; सँडहर्स्ट रोड स्टेशनवर मोठा अपघात
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावर मोठा अपघात झाला आहे. सँडहर्स्ट रोड स्टेशनवर लोकलने ४ प्रवाशांना उडवलं असल्याची माहिती समोर आली आहे. यात ३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे आंदोलनामुळे हे प्रवासी रुळावरून चालले होते, त्यावेळी अंबरनाथ फ़ास्ट लोकलने रेल्वे रुळावरून चालणाऱ्या प्रवाशांना उडवलं, यात तिघांचा मृत्यू झाला आहे. मात्र रेल्वेने याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले, त्यामुळे मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल नसल्यामुळे जवळपास सर्वच स्थानकांवर गर्दी वाढली. लोकलसेवा बंद असल्याने सँडहर्स्ट रोड स्टेशनवर ४ प्रवासी पायी चालले होते. मात्र अचानक लोकल आली आणि या प्रवाशांना घडक दिली. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. एका जखमी प्रवाशावर उपचार सुरू आहेत अशी माहिती समोर आली आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड होत आहे. या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना बसला आहे. २५ मिनिटे मध्य रेल्वे उशिराने धावत आहेत. सीएसएमटी वरून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावरून घरी जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरती वाहतूक उशिराने धावत आहेत.