ऑनलाइन रेंटल फसवणुकीपासून सावध रहा! — महाराष्ट्र सायबर सेलचा इशारा

Spread the love

ऑनलाइन रेंटल फसवणुकीपासून सावध रहा! — महाराष्ट्र सायबर सेलचा इशारा

रवि निषाद / मुंबई

मुंबई – ओएलएक्स, फेसबुक मार्केटप्लेस किंवा व्हॉट्सॲप ग्रुप्सवर घरभाड्याच्या बनावट जाहिरातींचे प्रमाण वाढले असून, नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर सेलचे पोलिस उपमहानिरीक्षक श्री. संजय शिंत्रे यांनी केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार हे स्वतःला घरमालक किंवा एजंट असल्याचे भासवतात. ते आकर्षक घरांचे फोटो, अतिशय कमी भाडे आणि डिजिटल करारपत्र पाठवून नागरिकांची दिशाभूल करतात. यानंतर घर दाखवण्यास नकार देत UPI किंवा बँक ट्रान्सफरद्वारे आगाऊ रक्कम मागतात. पैसे मिळाल्यानंतर मात्र हे गुन्हेगार संपर्क तोडून पळ काढतात.

श्री. शिंत्रे यांनी सांगितले की, “घर प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कोणतीही रक्कम अदा करू नका. एजंट किंवा मालकाची ओळख व्हिडिओ कॉलद्वारे तपासा. अधिकृत आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवरूनच व्यवहार करा. अतिशय आकर्षक ऑफरपासून सावध रहा आणि संशयास्पद जाहिरात दिसल्यास तातडीने तक्रार करा.”

नागरिकांना सायबर फसवणुकीपासून संरक्षण देण्यासाठी सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० तसेच संकेतस्थळ cybercrime.gov.in उपलब्ध आहे. तसेच, फसवणुकीचा प्रकार घडल्यास संबंधित व्यवहाराचे तपशील आणि स्क्रीनशॉटसह जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवावी, असेही आवाहन श्री. शिंत्रे यांनी केले आहे.

महाराष्ट्र सायबर सेलने नागरिकांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे — “सावध राहा, फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon