हातावर मेहंदी लावल्यामुळे विद्यार्थिनींना वर्गाबाहेर हाकललं; चेंबूरच्या सेंट अँथनी शाळेतील प्रकारावर संताप
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – चेंबूरमधील सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूलमध्ये हातावर मेहंदी लावून आलेल्या १५ ते २० विद्यार्थिनींना थेट वर्गाबाहेर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पालक आणि स्थानिक नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्यानंतर काही विद्यार्थिनींच्या हातांवर मेहंदी असल्याचे दिसताच शाळा प्रशासनाने त्यांना वर्गात प्रवेश नाकारला. शाळेच्या नियमावलीचा दाखला देत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी पालकांनी त्याला विरोध दर्शवला आहे.
प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण निरीक्षक डॉ. मुश्ताक शेख यांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेला नोटीस बजावून एका दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकारानंतर शाळेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून शिक्षण विभागाने चौकशी सुरू केली आहे.