अमरावतीत पोलिसांवर खुनाचा गुन्हा; आठ पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
पोलीस महानगर नेटवर्क
अमरावती – चांदुररेल्वे पोलीस ठाण्यातील कोठडीत रितेश मेश्राम यांच्या मृत्यू प्रकरणी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी मोठी कारवाई केली आहे. न्यायालयीन चौकशी अहवालाच्या आधारे आठ पोलीस कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा (कलम ३०२) दाखल करण्यात आला असून, संबंधित सर्वांना निलंबित करण्यात आले आहे.
५ जून २०२५ रोजी रितेश मेश्राम यांचा मृत्यू पोलिसांच्या ताब्यात असताना झाला होता. संशयित म्हणून ताब्यात घेतल्यानंतर काही तासांतच त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला. कुटुंबीयांनी पोलिसांवर मारहाणीचा आणि चुकीच्या वर्तणुकीचा आरोप करत न्यायाची मागणी केली होती.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत अनुसूचित जाती आयोगाने स्वतःहून चौकशी सुरू केली. आयोगाच्या प्राथमिक निष्कर्षानुसार, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे व चुकीच्या वर्तणुकीमुळे रितेश मेश्राम यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आयोगाने न्यायालयासमोर सविस्तर अहवाल सादर केला.
न्यायालयीन चौकशीत गार्ड इंचार्ज आणि गार्ड ड्युटीवरील पोलिसांना जबाबदार धरले गेले. त्यानंतर २ नोव्हेंबर २०२५ रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार आठ पोलिस कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे :
राजकुमार मुलामचंद जैन, विशाल मुकुंदराव रंगारी, अश्विनी शामरावजी आखरे, सरिता वैद्य, प्रविण रामदास मेश्राम, अलीम हकीम गवळी, अमोल अमृतराव घोडे आणि प्रशांत ढोके.
दरम्यान, या प्रकरणातील तत्कालीन ठाणेदार अजय अहिरकर यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून, आरोपी पोलिसांवर कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.