रेवदंडा किनाऱ्यावर पहिल्याच दिवसी नवख्या मच्छिमाराचा समुद्रात बुडून मृत्यू

Spread the love

रेवदंडा किनाऱ्यावर पहिल्याच दिवसी नवख्या मच्छिमाराचा समुद्रात बुडून मृत्यू

योगेश पांडे / वार्ताहर

रायगड – रायगडच्या रेवदंडा बंदर किनाऱ्यावर एका धक्कादायक घटनेत उत्तर प्रदेशातील प्रदीप कमजोरी गौतम (वय ३०) या तरुण मच्छिमाराचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. ‘जय भवानी’ या मच्छिमारी बोटीवर कामाला लागलेल्या प्रदीपचा हा पहिलाच दिवस होता. ३१ ऑक्टोबरच्या रात्री मासेमारीसाठी निघालेल्या बोटीतून प्रदीप अचानक बेपत्ता झाला आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आंग्रेनगर समुद्रकिनारी आढळून आला. पोलिसांनी अपघाती बुडाल्याची घटना असल्याचे म्हटले असले तरी, मृत्यूच्या कारणांचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे मच्छिमार समाजात हळहळ व्यक्त होत असून, नवीन कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप गौतम हा उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्याचा रहिवासी होता. तो नुकताच कामासाठी रेवदंडा येथे आला होता. ‘जय भवानी’ या मच्छिमारी बोटीवर रुजू झाल्याच्या पहिल्याच दिवशी त्याच्यावर काळाने घाला घातला. ३१ ऑक्टोबरच्या रात्री साडेनऊच्या सुमारास प्रदीप, राहुल कुमार रामसुंदर गौतम आणि इतर सहकारी खलाशी मासेमारीसाठी रेवदंडा बंदरातून समुद्रात निघाले होते. समुद्रात जाण्यापूर्वी त्यांनी बंदर परिसरात थोडा वेळ पार्टी केली होती.

बोट खाडीमार्गे समुद्रात पोहोचल्यानंतर सर्वजण जेवणासाठी बसले होते. त्यावेळी प्रदीप अचानक गायब झाला. त्याच्या सहकाऱ्यांनी तातडीने समुद्रात आणि किनाऱ्यावर त्याचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात प्रदीपच्या बेपत्ता असल्याची नोंद (क्र. १३/२०२५) करण्यात आली.

दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास आंग्रेनगर समुद्रकिनारी प्रदीपचा मृतदेह बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला तातडीने रेवदंडा सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

यानंतर, प्रदीपच्या मृतदेहाला अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी प्राथमिक तपासात ही घटना अपघाती बुडाल्याची असल्याचे सांगितले आहे. मात्र, मृत्यूच्या नेमक्या कारणांचा तपास अजूनही सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon