रुग्णालयाच्या जिन्याच्या पायऱ्यांवर वारंवार डोकं आपटून भाच्याकडून मामाचा निर्घृण खून; खडकपाडा पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – ठाणे जिल्ह्याच्या कल्याण येथील मोहने परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून भाच्याने आपल्या मामाचे डोके रुग्णालयाच्या जिन्याच्या पायऱ्यांवर आपटून त्यांची निर्घृण हत्या केली. या हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्यात नराधम भाचा क्रूरपणे मामाला मारताना दिसत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मरियप्पा नायर असं हत्या झालेल्या मामाचं नाव आहे. तर गणेश रमेश पुजारी असं आरोपी भाच्याचं नाव आहे. हत्येची घटना घडल्यानंतर अवघ्या एका तासात खडकपाडा पोलिसांनी आरोपी भाच्याला बेड्या ठोकल्या आहेत. हत्येनंतर आरोपी कल्याण रेल्वे स्थानकावरून पळून जात होता. याच वेळी पोलिसांनी त्याला जेरबंद केलं आहे.
मृत मामा मारियप्पा नायर आणि आरोपी भाचा गणेश रमेश पुजारी हे दोघेही मुंबईतील गोरेगाव परिसरात एकत्र राहत होते. भाचीची प्रसूती असल्याने हे दोघेही कल्याणमधील मोहने भागात असलेल्या रुग्णालयात आले होते. रुग्णालयात असतानाच मामा आणि भाच्यामध्ये घरगुती कारणावरून वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापाच्या भरात आरोपी भाचा गणेश पुजारी याने मामा मारियप्पा नायर यांना रुग्णालयाच्या जिन्याच्या पायऱ्यांवर नेले आणि त्यांचे डोके पायऱ्यांवर वारंवार आपटून त्यांची निर्दयपणे हत्या केली. या जीवघेण्या मारहाणीत मामा मारियप्पा नायर यांचा जागीच मृत्यू झाला.
रुग्णालयाच्या आवारात झालेली मारहाणीची ही संपूर्ण घटना आणि मामाची हत्या करण्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेजच्या आधारे पोलिसांना या गुन्ह्याची आणि आरोपीची ओळख पटवण्यास मदत झाली. घटनेनंतर आरोपी भाचा गणेश रमेश पुजारी हा पळून जाण्याच्या तयारीत होता. घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवली. पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकावरून आरोपी भाच्याला अटक केली आहे. खडकपाडा पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. या वादामागचे नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.