धक्कादायक! भिवंडीत वयोवृद्ध महिलेवर अत्याचार करून निर्घृण हत्या; परिसरात भीतीचे वातावरण
पोलीस महानगर नेटवर्क
भिवंडी – भिवंडी तालुक्यातील चावेभरे गावच्या हद्दीत घडलेल्या अमानुष घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. ६५ वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अज्ञात इसमाने शारीरिक अत्याचार करून दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेतावर कामासाठी गेलेल्या महिलेला अत्याचारानंतर निर्दयपणे ठार मारण्यात आल्यानं गावात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच गणेशपुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भिवंडी शासकीय रुग्णालयात पाठविला. तपासादरम्यान, महिलेच्या अंगावरील पाच ते सहा तोळे सोन्याचे दागिने जसेच्या तसे असल्याचे आढळले. त्यामुळे ही हत्या चोरीसाठी नव्हे, तर अत्याचारानंतर ओळख लपविण्यासाठी केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.a
दरम्यान, घटनेनंतर त्या परिसरातून तीन संशयित इसम पळून जाताना काहींनी पाहिल्याची माहिती मृत महिलेच्या मुलाने दिली आहे. पोलिसांनी या तिघांचा शोध घेण्यासाठी तपास मोहीम हाती घेतली असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या भयानक घटनेमुळे चावेभरे व परिसरात प्रचंड संतापाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडून आरोपींना त्वरीत अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
भिवंडीत घडलेली ही अमानुष घटना पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधोरेखित करत असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू केला आहे.