आपला दवाखाना’मध्ये साड्यांचे दुकान, ठाण्यात भाजप आक्रमक, शिंदे गटाविरोधात नवा संघर्ष?

Spread the love

आपला दवाखाना’मध्ये साड्यांचे दुकान, ठाण्यात भाजप आक्रमक, शिंदे गटाविरोधात नवा संघर्ष?

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीची सुरुवात केली आहे. शिवसेना शिंदे गटाचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाण्यातच भाजपने स्वबळाचा नारा देत शड्डू ठोकला आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सुरू झालेल्या आपला दवाखाना योजनेचा ठाण्यात बोजवारा उडाला आहे. त्यावरून आता भाजपने ठाण्यात चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मागील महायुती सरकारच्या काळात नागरिकांना घराजवळ मोफत आणि प्राथमिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला होता. शहरातील ५० ठिकाणी दवाखाने उघडण्याचा निर्णय घेतला गेला, त्यापैकी ४० दवाखाने सुरूही झाले. मात्र सध्या या बहुतेक दवाखान्यांवर कुलूप लागले असून प्रकल्प जवळपास ठप्प झाल्याचा आरोप भाजप आमदार संजय केळकर यांनी केला आहे.

केळकर यांच्या म्हणण्यानुसार, बंद पडलेल्या अनेक दवाखान्यांच्या जागा आता व्यावसायिक वापरासाठी दिल्या गेल्या आहेत. काही ठिकाणी पार्लर, किराणा दुकाने तर एका ठिकाणी तर साड्यांचे दुकानसुद्धा सुरू झाले आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना मिळणारी मोफत आरोग्यसेवा थांबली असून, महापालिकेच्या आरोग्यव्यवस्थेवर पुन्हा ताण वाढला आहे.

महापालिकेने विद्यमान २७ आरोग्य केंद्रांवरील भार कमी करण्यासाठी हा उपक्रम राबवला होता. ‘मेडऑनगोस आपला दवाखाना’ या संस्थेमार्फत या केंद्रांचे व्यवस्थापन केले जात होते. प्रति रुग्ण महापालिका प्रशासनाकडून सुमारे १५० रुपये देण्यात येत होते. तरीही, इतका निधी वापरूनही सेवा थांबण्यामागील कारणे अद्याप स्पष्ट नाहीत.

 

या प्रकल्पाची अचानक घडी विस्कटल्याने नागरिकांचे प्रश्न वाढले असून ठाणेतील आरोग्यसेवेवरील प्रशासनाच्या दृष्टीकोनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महापालिका प्रशासनाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.

भाजप आमदार संजय केळकर यांनी म्हटले की, ऑक्टोबरपर्यंत कंपनीकडे कंत्राट असतानाही ऑगस्टमध्ये दवाखाने बंद पडले. मागील सहा महिन्यापूर्वीचा पगारदेखील कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेने कंपनीकडून सर्व दंड वसूल करून कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार द्यावेत आणि संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी त्यांनी केली. प्रशासनाने कारवाई न केल्यास महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon