छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय पुन्हा चर्चेत; गरोदर मातांना प्रसूतीकळा होण्यापूर्वीच अव्यवस्थेच्या कळा
योगेश पांडे /वार्ताहर
ठाणे – ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (कळवा रुग्णालय) पुन्हा एकदा प्रशासनाच्या अव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रसूतिगृहातील खाटांची मर्यादा ओलांडल्याने गरोदर मातांना प्रसूतीकळा येण्यापूर्वीच रुग्णालयाच्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
कळवा रुग्णालयाच्या प्रसूतिगृहात फक्त २५ खाटांची सुविधा असून सध्या ३२ गरोदर महिलांवर उपचार सुरू आहेत. जागेअभावी काही महिलांना थंड फरशीवर झोपण्याची वेळ आली आहे. इतकेच नव्हे, तर आणखी आठ गर्भवती महिला खाटांच्या प्रतीक्षेत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनास ठाणे जिल्हा रुग्णालय वा केईएम (मुंबई) येथे गर्भवतींना पाठवण्याची नामुष्की ओढवली आहे.
डिसुझावाडी आरोग्य केंद्रातून कळवा रुग्णालयात पाठवलेल्या एका गर्भवती महिलेच्या कुटुंबाला अलीकडेच मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. रुग्णालयात पोहोचल्यावर बेड फुल असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी आधी सोनोग्राफी करून आणण्यास सांगितले, मात्र परत आल्यानंतर त्या महिलेला ठाणे जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. या वेळखाऊ प्रक्रियेमुळे गर्भवती व तिच्या कुटुंबीयांना तीव्र मनस्ताप सहन करावा लागला.
कळवा रुग्णालयावर केवळ ठाणे नव्हे तर अंबरनाथ, उल्हासनगर, नवी मुंबई, भिवंडी, वसई-विरार, पालघर अशा दूरच्या भागातील गर्भवतींचा देखील ताण आहे. त्यामुळे या रुग्णालयावर असलेले भार वाढतच चालले आहे.
ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी गर्दीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “अतिरिक्त दाखल झालेल्या महिलांसाठी जादा बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालयात झालेल्या प्रसूतींपैकी ६० टक्के सिझेरियन, तर ४० टक्के नॉर्मल डिलिव्हरी आहेत. सर्व माता व बाळांची प्रकृती चांगली आहे आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर देखरेख ठेवत आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “कळवा रुग्णालयातील महिलांसाठीचा विशेष वॉर्ड ७२ खाटांचा असून तोही सध्या फुल्ल आहे. ज्या महिलांना प्रकृती सुधारली आहे त्यांना शनिवारी घरी सोडण्यात आले आहे. सध्या ५०० बेड क्षमतेच्या रुग्णालयात ५०४ रुग्ण उपचार घेत आहेत. ओपीडीमध्ये दररोज १८०० ते २२०० रुग्ण उपचारासाठी येतात.”
रुग्णालयाचे विभाग सध्या ६५ कोटी रुपयांच्या खर्चाने नूतनीकरणाधीन आहेत. तसेच भविष्यात रुग्णालयातील बेडची क्षमता अजून ५०० ने वाढविण्याचे नियोजन सुरू असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
कळवा रुग्णालयातील वाढती गर्दी, अपुरी पायाभूत सुविधा आणि बेडअभावी होणारी रुग्णांची दगदग यामुळे ठाणे महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांचा प्रश्न असा की — “रुग्णालयात सुधारणा होण्यापूर्वीच गरोदर मातांना अव्यवस्थेच्या वेदना किती काळ भोगाव्या लागणार?”