कल्याण स्टेशनलगत चार हॉटेलांचा ‘बेकायदा जलसा’!
परवानगीशिवाय उभारले तळमजले व पोटमाळे, एमआरटीपी कायदा धाब्यावर!

“महापालिकेची प्रतिमा मलिन; प्रभाग अधिकारी थोरात याचा हात भ्रष्टाचारामुळे थरथरतोय का?”
भ्रष्टाचाराच्या डबक्यात आकंठ बुडालेत केडीएमसी चे अधिकारी
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण (प.) रेल्वे स्थानक परिसरातील चार नामांकित हॉटेलांवर हॉटेल संतोष, हॉटेल विकास, हॉटेल अमर पॅलेस आणि हॉटेल विश्व पॅलेस यावर बेकायदेशीर बांधकामांचे गंभीर आरोप लागले आहेत. या सर्व आस्थापनांनी महापालिकेची परवानगी न घेता तळमजले आणि पोटमाळे उभारले असून, ‘एमआरटीपी कायद्या’चा सर्रास भंग केल्याचे दस्तऐवजीकरणातून स्पष्ट झाले आहे.
या हॉटेलांविरोधात तातडीने निष्कासनाची कारवाई आणि गुन्हा नोंदविण्याची मागणी दैनिक पोलीस महानगर या वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक प्रकाश संकपाळ यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी स्वरूपात केली आहे.
🔴 परवानगीशिवाय तळमजले व पोटमाळ्यांचे बांधकाम
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित हॉटेलांनी कोणतीही बांधकाम परवानगी न घेता अतिरिक्त तळमजले आणि पोटमाळे बांधले आहेत. ‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकारी थोरात आणि नगररचना विभागाने माहिती अधिकार कायद्यांतर्गत दिलेल्या अहवालात ही बेकायदेशीर कामे स्पष्टपणे नोंदविली आहेत.
🔴 एम.आर.टी.पी. कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची मागणी
तक्रारकर्त्यांनी स्पष्ट केले आहे की, या प्रकरणी निष्कासनाची कारवाई आणि एम.आर.टी.पी. कायद्यानुसार गुन्हा दाखल करणे आवश्यक असूनही आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पाहणी अहवाल, कलम २६० अंतर्गत नोटीस, सुनावणी नोटीस आणि बांधकाम अधिकृत किंवा अनधिकृत असल्याचे अहवाल तपासून निर्णय घ्यावा, अशी मागणीही पत्रात केली आहे.
फायर नियमांचा भंग; भविष्यात धोका?
या हॉटेलांनी अग्निशमन विभागाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. फायर ऑडिट अहवालात त्रुटी असून, भविष्यात दुर्घटना घडल्यास जबाबदारी अधिकाऱ्यांवरच येईल, असेही नमूद करण्यात आले आहे. शासनाकडे खोटे अहवाल सादर करणाऱ्या फायर अधिकाऱ्यांविरुद्धही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
“महापालिकेची प्रतिमा मलिन होत आहे”
तक्रारीनुसार, महापालिका आयुक्तांनी यापूर्वी सहाय्यक आयुक्तांना अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्या सूचनांकडे क प्रभागक्षेत्र कार्यालयाकडून पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी, महापालिकेची प्रतिमा मलिन होत असून नागरिकांचा विश्वास डळमळीत झाल्याचे म्हटले आहे.
🚨 “आदेश असूनही क प्रभाग अधिकारी थोरात यांचा हात का थरथरतो?”
सदर हॉटेलांची अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याबाबत लेखी आदेश असतानाही ‘क’ प्रभागक्षेत्र अधिकारी थोरात याचा हात कारवाईच्या वेळी थरथरतोय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. परिसरात चर्चा आहे की, संबंधित अधिकारी हॉटेल चालकांकडून मलिदा जमा करण्याच्या व्यवहारात गुंतलेले आहेत.
🔴दैनिक पोलीस महानगर यांनी आयुक्तांकडे खालील मागण्या केल्या आहेत —
१. अनधिकृत बांधकामे तातडीने निष्कासित करून जमीनदोस्त करावीत.
२. संबंधितांवर एम.आर.टी.पी. कायद्यानुसार गुन्हा नोंदवावा.
३. कारवाईत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई करावी.
४. फायर विभागातील खोटे अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी.
🔴आयुक्तांची भूमिका महत्त्वाची
वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या क प्रभाग अधिकारी थोरात विरोधात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त आता कोणती कारवाई करतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.