भिवंडीत अतिधोकादायक इमारत कोसळली; किराणा दुकानदार ढिगाऱ्याखाली अडकला, सुदैवाने बचावला
पोलीस महानगर नेटवर्क
भिवंडी – भिवंडी शहरातील आजमी नगर – हाफिज नगर परिसरात शनिवारी दुपारी एक जुनी इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. चाळीस वर्षांपूर्वी बांधलेली ही एकमजली इमारत अतिधोकादायक श्रेणीत मोडत होती. या दुर्घटनेत तळमजल्यावर असलेल्या किराणा दुकानाचा काही भाग कोसळल्याने दुकानदार ढिगाऱ्याखाली अडकला होता. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या तळमजल्यावर किराणा दुकान तर वरच्या मजल्यावर काही रहिवासी राहत होते. सुदैवाने घटनेच्या वेळी वरच्या मजल्यावर कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच भिवंडी महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल व स्थानिक पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, इमारतीच्या आजूबाजूचा परिसर खबरदारी म्हणून रिकामा करण्यात आला आहे.
दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या इमारतीला अतिधोकादायक घोषित केल्यानंतरही ती रिकामी करण्यात आली नव्हती, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. महापालिकेकडून सध्या इमारत पूर्णतः निष्काषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नशिबाने मोठी दुर्घटना टळल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून, जुन्या व अतिधोकादायक इमारतींच्या तपासणीची मागणी स्थानिकांनी केली आहे.