कफ परेड परिसरातील चाळीत भीषण आग; १५ वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू, तीन जण जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील कफ परेड परिसरातील एका चाळीत सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत होरपळून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आणि तिघे जखमी झाले. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती. दुर्घटनेबाबतची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि एका तासाच्या आत आग विझवण्यात यश आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कफ परेड येथील मच्छिमार नगरमध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास एका चाळीत अचानक आग लागली. चाळीत आग लागल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आणि धावपळ सुरू झाली. आगीच्या धुरामुळे आणि ज्वालांमुळे जीव वाचवण्यासाठी नागरिक सैरावैरा धावू लागले. काहींनी याबाबतची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल जाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर एका तासाच्या आत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे स्वरूप पाहता ती विद्युत वायरिंग आणि ईव्ही बॅटरीमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या दुर्घटनेत एका १५ वर्षीय तरुणाने आपला जीव गमावला आहे. तसंच इतर तीन जखमींना तातडीने उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले असून त्यांच्या प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
दरम्यान, या आगीचे नेमकं कारण काय होतं, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. आगीमुळे मच्छिमार नगरमधील रहिवाशांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेकांची घरे जळून खाक झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार आणि खासदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी प्रशासनाला तातडीने मदतकार्य करण्याचे निर्देश दिले असून जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे.