परभणीत तरुणीवर सामूहिक अत्याचार, ६ नराधमांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
परभणी : जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात ऐन दिवाळी सणाच्या काही दिवस अगोदर तरुणीवर सामूहिक अत्याचाराची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका झाडाखाली आपल्या प्रियकर मित्रांसोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी, पोलिसांनी आरोपीना अटक केल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. तसेच, जिथे कोणी जात नाही तिथे तरुण-तरुणींनी जाऊ नये, असा सल्लादेखील पालकमंत्र्यांनी दिला आहे.
जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी संस्थान इटोली परिसरात १४ ऑक्टोबर रोजी एका गंभीर आणि संतापजनक घटनेची नोंद झाली आहे. या घटनेने संपूर्ण परभणी जिल्हा सुन्न झाला असून झाडाखाली गप्पा मारत बसलेल्या तरुणीजवळ अचानक ६ जण आले अन् तिच्यासोबत असलेल्या तरुणाला पकडून ठेवलं. त्यातील ३ जणांनी तरुणीवर सामूहिक अत्याचार केला व या घटनेचा व्हिडिओ देखील चित्रित केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत ६ नराधमांना अटक केली आहे. याप्रकरणी, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही दखल घेत आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं म्हटलं.
तरुणीवरील सामूहिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी योग्य ती कारवाई केली आहे. समाजानेही या विकृत मानसिकते विरोधात एकत्र आले पाहिजे, असे आवाहन मेघना बोर्डीकर यांनी केलंय. तसेच, ज्या ठिकाणी कुणी जात नाही-येत नाही, अशा ठिकाणी तरुण-तरुणींनी जाऊ नये. स्वसंरक्षणासाठी त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे. कारण, समाजात विकृत मानसिकता वाढलेली आहे. या प्रकरणात पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल करून या आरोपींना अटक केलेली आहे. पुढची कारवाई देखील कडक केली जाईल, आरोपींना कठोर शिक्षा होईल याची खबरदारी आम्ही घेऊ. मात्र, समाजानेही विकृत मानसिकता ओळखून त्याच्याविरोधात लढलं पाहिजे, असे आवाहनही परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं आहे.
दरम्यान, मुलीवर शारीरिक अत्याचार करुन नराधमांनी तिच्याकडून पाच हजार रुपये देखील काढून घेतले होते. त्यापैकी तिघांनी शारीरिक अत्याचार केला, इतरांनी त्यासाठी मदत केली या आरोपावरून या सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली असून सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन विनीवाल यांच्या नेतृत्वात विशेष ८ पथकांची नियुक्ती करण्यात आलीय अशी माहिती पोलिसांनी दिलीय.