दिवसा घरफोडी करणाऱ्या दोन अड्डल महिला चोरट्या अखेर पोलिसांच्या जाळ्यात!
ठाण्यातील नौपाडा पोलिसांची मोठी कारवाई; १३.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे : ठाण्यातील नौपाडा पोलिसांनी दिवसा घरफोडी करून दागिने आणि रोकड चोरणाऱ्या दोन अड्डल महिला चोरट्यांना अटक करण्यात यश मिळवले आहे. तब्बल दहा दिवसांच्या सातत्यपूर्ण तपासानंतर पोलिसांनी या दोन्ही आरोपींना मुंबईतील कुर्ला परिसरातून शिताफीने अटक केली. या कारवाईत पोलिसांनी १३ लाख ५० हजार रुपयांचा १०३ ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
फिर्यादी निरज प्रेमजी कारिया (वय २७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नौपाडा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६७६/२०२५ भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी आणि त्यांची पत्नी कामानिमित्त घराबाहेर असताना अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीने दरवाजा उघडून घरात प्रवेश केला आणि सुमारे पाच लाख रुपयांचे दागिने व रोकड चोरीस गेल्याची नोंद होती.
नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा दिवसा घरफोडीच्या मालिका सुरू असल्याने पोलिसांनी गुन्हे उकलण्यासाठी ९० ते १०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. या पाहणीवरून आरोपींची ओळख पटवून पोलिसांनी सापळा रचला आणि १५ ऑक्टोबर रोजी कुर्ला येथून दोन्ही महिला चोरट्या — सारीका शंकर सकट (वय ३३) आणि सुजाता शंकर सकट (वय ३५) — यांना ताब्यात घेतले.
या आरोपींनी चौकशीत नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तीन घरफोडी गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्यात गु.र.नं. ६७६/२०२५, ११७०/२०२५ आणि २७१/२०२५ हे गुन्हे समाविष्ट आहेत. तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून एकूण १३.५० लाख रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दोन्ही आरोपींचा गुन्हेगारी इतिहासही मोठा असून, ठाणे, डोंबिवली, सांताक्रुझ, घाटकोपर, जुहू, कस्तुरबा मार्ग, कांदीवली, मुलुंड या ठिकाणी त्यांनी पूर्वीही अनेक घरफोड्या केल्याचे उघड झाले आहे.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दवणे, पोलीस निरीक्षक राठोड (प्रशासन) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी मंगेश भांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, तसेच पोहवा गायकवाड, रांजणे, देसाई, गोलवड, तडवी, पो.ना. धोंडे, पोशि. शिंदे, कांगणे, तिर्थकर आणि वडर यांनी विशेष मेहनत घेतली.
संपूर्ण कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजीराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
> ठाणे पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, गुन्हा कितीही कौशल्याने केला तरी कायद्याच्या जाळ्यातून सुटका अशक्य आहे.