नाशिक-मुंबई हायवेवर दरोड्याची तयारी उधळली; झारखंडी नक्षलीसह सहा जणांना अटक – तीन अग्निशस्त्रे जप्त

Spread the love

नाशिक-मुंबई हायवेवर दरोड्याची तयारी उधळली; झारखंडी नक्षलीसह सहा जणांना अटक – तीन अग्निशस्त्रे जप्त

पोलीस महानगर नेटवर्क 

ठाणे — ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पथकाने धाडसी कारवाई करत नाशिक-मुंबई महामार्गावर दरोड्याची तयारी करणाऱ्या सहा जणांना अग्निशस्त्रांसह अटक केली आहे. या आरोपींपैकी पाच जण झारखंडमधील नक्षलवादी पार्श्वभूमीचे असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

१४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पोलीस हवालदार संदीप भांगरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, खारेगाव टोलनाक्याजवळील कळवा मार्गावर सापळा रचण्यात आला. बोलेरो (क्र. JH-01-CX-4728) वाहनातून आलेले संशयित झारखंडातून आले असल्याची माहिती होती. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले असता ते महामार्गावरील वाहनांना अडवून प्राणघातक शस्त्रांच्या धाकावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे उघड झाले.

अटक आरोपींमध्ये राजेंद्र महेश यादव (२७), मोहम्मद सरफराज अब्दुल सत्तार अन्सारी (३६), अब्दल रहीम सलीम अन्सारी (३०), सददान अबुल अन्सारी (३०), शिवकुमार चौथा उराव (४०) हे सर्व झारखंडमधील रहिवासी आहेत तर अरविंद बाबूराम यादव (२१), सिद्धार्थनगर (उत्तर प्रदेश).

पोलिसांनी या कारवाईत बोलेरो वाहनासह ३ अग्निशस्त्रे, ४ जिवंत काडतुसे, लोखंडी कोयता, कटावणी, मिरची पूड, दोरखंड, तसेच ६ मोबाईल फोन असा एकूण ₹७,९६,९०० किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.

कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ७९९/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१०(४)(६), भा.ह.का. ३,२५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई डॉ. पंजाबराव उगले (अपर पोलीस आयुक्त – गुन्हे), श्री. अमरसिंह जाधव (उप पोलीस आयुक्त – गुन्हे), श्री. विनय घोरपडे (सहाय्यक पोलीस आयुक्त – गुन्हे शोध-२) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात वपोनि गोरखनाथ घार्गे, सपोनिरी अब्दुल मलीक, पोउनिरी संजय मिसे, सपोउनिरी शिवाजी गायकवाड, तसेच पोहवा दिनेश कुंभारे, प्रशांत भुर्के, संदीप भांगरे, महेश साबळे, अनुप कामत, जयकर जाधव, राहुल शिरसाठ, पोना राचिन कोळी, तौसीफ सैयद, पोअं. अशोक पाटील, महेश सावंत, चापोअं. सदन मुळे, मपोहवा आशा गोळे आणि मपोना गिताली पाटील यांनी सहभाग घेतला असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी, शैलेश साळवी, पोलीस आयुक्तालय ठाणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon