मुरबाड पोलिसांची विजेच्या वेगाने कारवाई; वयोवृद्ध शेतकऱ्याला लुटणारा चोरटा अवघ्या दोन तासांत गजाआड!
पोलीस महानगर नेटवर्क
मुरबाड – मुरबाड पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या तत्परतेचे आणि कार्यक्षमतेचे दर्शन घडवले आहे. वयोवृद्ध शेतकऱ्याला लुटणाऱ्या चोरट्याला केवळ दोन तासांत पकडून पोलिसांनी शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला. ही घटना १० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी साडे दोनच्या सुमारास घडली. धर्मा कृष्णा रांजणे (वय ६०, रा. मडकेपाडा, ता. मुरबाड, जि. ठाणे) हे शेतीसाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून ५० हजार रुपये रोकड काढून बाहेर पडले होते. त्याचवेळी एका अनोळखी व्यक्तीने मागून येऊन त्यांना धक्का दिला आणि हातातील हिरव्या रंगाच्या पिशवीतील रोकड हिसकावून पळ काढला.
तक्रार मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके यांनी स्वतः प्रकरणाची जबाबदारी हाती घेतली. पोलिसांनी तात्काळ अनेक पथके तयार केली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली. फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख सोपान वामन शेळके (वय ३९, रा. आगाशी, ता. मुरबाड) अशी पटली. गुप्त बातमीदारांकडून आरोपी चायनीज दुकानाजवळ दिसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने कारवाई केली. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी अचूक पाठलाग करत त्याला गजाआड केले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९(६) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई डॉ. डी.एस. स्वामी (पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण), अनमोल मित्तल (अपर पोलीस अधीक्षक), अनिल लाड (उपविभागीय पोलीस अधिकारी, मुरबाड) आणि मिलिंद शिंदे (उपविभागीय पोलीस अधिकारी, शहापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके, पो.उपनिरीक्षक श्याम आरमाळकर, पो.उपनिरीक्षक सुनिल पवार, सहायक फौजदार डी.बी. हिंदुराव, पो.हवा. आर.एम. शिंदे, पो.कॉ. ए.आर. पारधी, पो.कॉ. विक्रांत महाजन, तसेच सायबर विभागाचे पो.हवा. दीपक गायकवाड आणि पो.हवा. रविंद्र मोरे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश बोल करीत आहेत.