माजी पोलीस आयुक्तांची ३ कोटींची फसवणूक; बिल्डरवर बनावट स्वाक्षरी व जमीन बळकावल्याचा गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
नागपूर – शहराचे माजी पोलीस आयुक्त अंकूश धनविजय यांची तब्बल ३ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका विकासकाने धनविजय यांची बनावट स्वाक्षरी करून चार एकर शेतजमीन निवासी क्षेत्रात रूपांतरित करून बळकावल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, जमीन देण्याच्या बदल्यात देण्यात येणाऱ्या थ्री बीएचके सदनिकेचा ताबाही आजवर दिला गेलेला नाही.
ही फसवणूक उघडकीस आली ती २८ सप्टेंबर २०२५ रोजी, जेव्हा धनविजय यांनी हिंगणा उपनिबंधक कार्यालयात प्रमाणित कागदपत्रांची प्रत मिळवली. तपासात समोर आले की, बिल्डर प्रविण वालदे याने १० ऑक्टोबर २०२२ रोजी धनविजय यांच्या नावाने नागपूर सुधार प्रन्यासकडे भाग नकाशासाठी अर्ज दाखल केला होता.
त्या अर्जात वालदेने धनविजय यांची बनावट स्वाक्षरी, चुकीचा ई-मेल पत्ता, तसेच स्वतःचा मोबाईल क्रमांक वापरला. याशिवाय धनविजय यांच्या पोलीस आयुक्त कार्यकाळातील जुना पत्ता वापरल्याने ही फसवणूक दीर्घकाळ त्यांच्या लक्षात आली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, धनविजय यांनी आपल्या मुलीला बक्षिस म्हणून १० हजार चौरस फुटांची जमीन दिली होती. त्या विक्रीप्रसंगीच त्यांची ओळख वालदे या बिल्डरशी झाली. पुढे या ओळखीचा गैरफायदा घेत वालदेने धनविजय यांच्या चार एकर जमिनीची माहिती मिळवली आणि रेडी रेकनरमधील वाढ दडवून ती जमीन फक्त ३६ लाख रुपयांच्या किमतीत दाखवली.
त्या बदल्यात वालदेने धनविजय यांना वर्धा मार्गावरील थ्री बीएचके सदनिकेचा प्रस्ताव दिला होता. मात्र आजपर्यंत त्यांचा सदनिकेवर ताबा दिला गेलेला नाही.
घटनेचा उलगडा झाल्यानंतर अंकूश धनविजय यांनी बिल्डर प्रविण वालदे विरोधात बनावटगिरी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
🔸 घटनेचा सारांश:
आरोपी बिल्डर: प्रविण वालदे
फसवणुकीची रक्कम: अंदाजे ₹३ कोटी
जमीन: ४ एकर, निवासी क्षेत्रात आलेली
गुन्हा: बनावट स्वाक्षरी, चुकीचा ईमेल व मोबाईल वापर
तपास: हिंगणा पोलिसांच्या अखत्यारीत सुरू
माजी आयुक्तांच्या प्रतिष्ठेवर घाला घालणाऱ्या या प्रकारामुळे नागपूर पोलिस दलात खळबळ माजली आहे.