नोकरीचं आमिष दाखवून तरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडित तरुणींची सुटका
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यात मागील काही वर्षांत गुन्हेगारी फोफावत असताना अवैध धंद्यांचाही सुळसुळाट झाला आहे. शहरात वेश्याव्यवसायाच्या घटना सातत्याने उघडकीस येत असून पश्चिम बंगालमधील दोन तरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दलालाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ब्यूटी पार्लरमध्ये नोकरीचं आमिष दाखवत या तरुणींना पुणे शहरात आणण्यात आलं होतं. पोलिसांनी पीडित तरुणींची सुटका केली असून, दलालाला अटक केली असली तरी त्याची पत्नी मात्र फरार आहे. राजू चिद्रवार-पाटील असं पोलिसांनी अटक केलेल्या दलालाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्यूटी पार्लरमध्ये टाकलेल्या धाडीनंतर पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी राजू चिद्रवार-पाटील (२५) याला अटक केली आहे. राजू चिद्रवार याची पत्नी मीरा हिच्याविरूद्धही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २२ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. राजू व मीरा यांनी पश्चिम बंगालमधील दोन तरुणींना नोकरीचं आश्वासन देत फसवलं. चिद्रवरा पती-पत्नीनं तरुणींना पुण्यात ब्यूटी पार्लरमध्ये चांगली नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं.
पश्चिम बंगालमधील तरुणी नोकरीच्या आशेनं पुण्यात आल्यानंतर मात्र त्यांना कामावर न घेता राजू चिद्रवार आणि त्याच्या पत्नीकडून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आलं. गेल्या आठवड्यात राजूने आणखी एका तरुणीला शहरातील आंबेगाव पठार भागात आणलं व तिलाही या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, संधी मिळताच या तरुणीने पुणे पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि याबाबत तक्रार दिली.
दरम्यान, पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी तत्परता दाखवत शोधमोहीम सुरू केली. पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकला आणि या छाप्यात तक्रारदार तरुणीसह एकूण दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजू चिद्रवारला अटक केली. परंतु, त्याची पत्नी मीरा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेली नाही. पोलीस तिचा शोध घेत असून पुढील तपास केला जात आहे.