प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादात प्रेयसीनं भाऊ आणि भावजाईच्या संगनमताने प्रियकराची केली हत्या; पोलीसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

Spread the love

प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादात प्रेयसीनं भाऊ आणि भावजाईच्या संगनमताने प्रियकराची केली हत्या; पोलीसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद अखेर खुनात परिवर्तित झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. प्रियकर सतत भांडण करत असल्याने त्रस्त झालेल्या प्रेयसीनं आपल्या भावाला आणि होणाऱ्या भावजयीला बोलावून प्रियकराचा खून केला. त्यानंतर मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून निर्जनस्थळी फेकून दिला. ही धक्कादायक घटना चाकण एमआयडीसी परिसरातील कडाचीवाडी येथे घडली असून, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी केवळ ४८ तासांत तिघांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली.

खून झालेल्याचे नाव मुकेश कुमार (२४) असे असून, अटक झालेल्यांमध्ये आरतीकुमारी बिजलाऊराम उराव (२३), आकाश बिजलाऊराम उराव (२१) आणि बालमुनी कुमारी रामचंद्र उराव (२१) या तिघांचा समावेश आहे. तिघेही झारखंड येथील रहिवासी आहेत. आरतीकुमारी आणि मुकेशकुमार यांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काही महिन्यांपूर्वी दोघेही पुण्यातील चाकण एमआयडीसी परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते.

मुकेशकुमार हा वारंवार आरतीकुमारीला मारहाण आणि शिवीगाळ करत असे. या सततच्या त्रासाला कंटाळून आरतीकुमारीनं आपल्या भावाला आकाशला आणि त्याची होणारी पत्नी बालमुनीला मदतीसाठी बोलावून घेतले. दि. २ ऑक्टोबर रोजी रात्री आरतीकुमारी आणि मुकेश यांनी दारू प्राशन केले. त्यानंतर पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात आरतीकुमारी, तिचा भाऊ आणि भावजयी यांनी मिळून मुकेशवर झडप घालून बेदम मारहाण केली.यानंतर तिघांनी खोलीतील फरशी स्वच्छ केली आणि पहाटेच्या सुमारास मुकेशचा मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून खोलीजवळील निर्जनस्थळी नेला. तिथे त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर विटा व दगडाने प्रहार करून त्याचा खून केला. मृतदेहावर गवत टाकून त्यांनी खोली सोडली आणि तिथून पळून गेले.

कडाचीवाडी परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकानं तपास सुरू केला. परिसरात मृतदेहाचे फोटो दाखवून चौकशी करण्यात आली. खोलीमालकाकडून मोबाईल नंबर मिळवून तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर संशयित छत्रपती संभाजीनगर येथे असल्याचे उघड झाले. तपासानंतर संशयितांना अटक केली. तिघांकडून चौकशी सुरू असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या खुनामुळे चाकण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon