पुण्यात दहशतवादी लपल्याच्या संशयावरून पुणे पोलीस आणि एटीएसचं कोंढवा भागात कोंबिंग ऑपरेशन; काही संशयित ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – राज्यासाठी मुंबईइतकंच अत्यंत महत्वाचं असलेलं पुणे शहर विविध कारणांनी नेहमी चर्चेत राहतं. पुणे शहर आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे ते काल रात्री झालेल्या पुणे पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमुळे. पुण्यात दहशतवादी लपल्याच्या संशयातून हे ऑपरेशन करण्यात आले असल्याची माहिती आहे.
पुण्यातल्या कोंढवा भागात मध्यरात्री एटीएस आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे सर्च ऑपरेशन राबवले. याप्रकरणामध्ये तब्बल १८ संशयितांना ताब्यात घेण्यासाठी निघालेल्या या संयुक्त पथकाला काही संशयित ताब्यात घेण्यात यश आले आहे. त्यांची चौकशी सुरु करण्यात आली असल्याची माहितीही मिळते आहे. दरम्यान, या कारवाईमुळे राज्यासह देशात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पुण्यात दहशतवादी आढळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. दोन वर्षांपूर्वीच पुणे पोलिसांनी बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या ३ जणांना पकडले होते. त्यानंतर देशातील संभाव्य कट उधळला होता. ते दहशतवादीही कोंढाव्यातच वास्तव्य करत होते.
पुणे पोलिस व एटीएसची ही कारवाई रात्री उशिरा सुरु झाली. मोठी गुप्तता पाळत ही कारवाई पहाटेपर्यंत सुरु होती. या कारवाईमुळे देशातील दहशतवादाचा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे.गुप्तचर विभागाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनंतर त्यांनी पुणे पोलिसांच्या सहाय्याने काही संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. सदर प्रकरणी सध्या काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे व त्यांची चौकशी सुरु आहे.