माझगावमध्ये ड्रग्ज माफिया ‘मुन्ना हाजी’ अटक; २० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई – मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटने मझगाव परिसरात मोठी कारवाई करत कुख्यात ड्रग्ज सप्लायर मुन्ना हाजी उर्फ बंगाली बाबू याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून २० ग्रॅम एमडी (मेथेड्रोन) ड्रग्ज जप्त केली असून, त्याची बाजारभाव किंमत सुमारे ₹५ लाख इतकी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मझगाव येथील जे. एम. राठोड मार्गावरील हेमिल्टन रेसिडेन्सी टॉवरसमोर, लाल रंगाच्या सार्वजनिक शौचालयाजवळ मुन्ना हाजी आपल्या पत्नी सना हिच्यासह खुलेआम एमडी ड्रग्जची विक्री करत होता. या हालचालीची माहिती वरळी युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून काल रात्री मुन्ना हाजी याला ड्रग्ज विक्री करताना रंगेहात पकडले. झडतीदरम्यान त्याच्याकडून २० ग्रॅम एमडी ड्रग्ज मिळाले. पोलिसांनी त्याला अटक करून आज, ८ ऑक्टोबर रोजी किल्ला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सध्या पोलिस आरोपीकडून ड्रग्जचा पुरवठा कोठून होत होता, तसेच या जाळ्यात आणखी कोण सहभागी आहे, याचा तपास करत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त श्री. देवेन्द्र भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली, डीसीपी (एएनसी) श्री. नवनाथ ढवळे, एसीपी (एएनसी) श्री. सुधीर हिरडेकर, तसेच वरळी युनिटचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.