केडीएमसी मुख्यालयासमोर मडका फोडो आंदोलन; डोक्यावर मडके घेवून महिलांचा संताप
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिका काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत असते. कधी खराब रस्त्यामुळे तर कधी वाहतूक कोंडीमुळे केडीएमसी प्रशासनावर जोरदार टीका होते. नुकतेच आरोग्य सेवे बाबत ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डोंबिवलीतील मावशी आणि तिच्या भाचीचा सर्प दंशाने योग्य उपचान न मिळाल्यामुळे मृत्यू झाला होता. याच्या निषेधार्थ डोंबिवलीकर केडीएमसीवर धडकले होते. आता कल्याण इथल्या कल्याण डोंबिवली महापालिका कार्यालया समोरच संतप्त नागरिकांनी आंदोलन केले.
केडीएमसी क्षेत्रात वेगवेगळ्या अडचणी आहेत. त्यात आता पाणी टंचाई आणि दुषित पाणी पुरवठ्याच्या समस्येने डोकं वर काढलं आहे. कल्याण पश्चिमेतील भगवाननगर आणि एव्हरेस्ट परिसरातील नागरीकांना केडीएमसीकडून कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर नागरीकांना दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. याबाबत वारंवार तक्रारही केडीएमसीकडे करण्यात आले. पण त्याची कोणतीही दखल घेतली नाही. परिस्थिती जैसे थेच दिसू आली.
या पार्श्वभूमीवर केडीएमसीच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक उमेश बोरगांवकर यांच्या पुढाकाराने केडीएमसी मुख्यालयावर मडका मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त महिलांनी डोक्यावर मडके घेतले होते. त्यानंतर त्यांनी हेच मडके मुख्यलया समोर फोडून केडीएमसी प्रशासनाचा जाहीर निषेध केला. संतप्त नागरीकांनी महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. ही समस्या सोडविली नाही तर रास्ता रोको करण्याचा इशारा माजी नगरसेवक बोरगांवकर यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला आहे.
रस्ते, वाहतूक, आरोग्य त्यानंतर आता पाण्याचा प्रश्न ही कल्याण डोंबिवलीत निर्माण झाला आहे. त्यात आता दुषित पाणी आणि अपूऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक आताच त्रस्त झाले आहेत. मे महिना अजून यायचा आहे. या काळात तर पाण्याचा आणखी गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे केडीएमसी प्रशासनाला त्याचे आताच नियोजन करावे लागणार आहे. ऑक्टोबर महिन्यातच पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातून आता केडीएमसी प्रशासन कसा मार्ग काढतो ते पाहावे लागणार आहे.