पुण्यातील घरफोडी प्रकरणातील फरार चोरटा गुवाहाटीत पकडला! बाणेर पोलिसांची कारवाई

Spread the love

पुण्यातील घरफोडी प्रकरणातील फरार चोरटा गुवाहाटीत पकडला! बाणेर पोलिसांची कारवाई

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – बाणेर परिसरात झालेल्या घरफोडीप्रकरणी फरार असलेल्या चोरट्याला पोलिसांनी तब्बल आसाममधील गुवाहाटी शहरातून ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेला लॅपटॉप, मोबाईल फोन आणि एटीएम कार्डे असा सुमारे ₹३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या प्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१६/२०२५, भादंवि कलम ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांच्या अनुपस्थितीत अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून आत प्रवेश केला आणि पाच मोबाईल फोन, एक लॅपटॉप, पाच एटीएम कार्डे आणि ₹३,००० रोख अशी एकूण ₹७३ हजारांची चोरी केली होती.

तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी सुरुवातीला कोलकातामध्ये लपल्याचे समजले. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक के. बी. डाबेराव यांच्या नेतृत्वाखालील पथक कोलकात्यात रवाना झाले. मात्र पुढील तपासात आरोपी गुवाहाटीकडे गेल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तातडीने तेथे हालचाल केली आणि मोहम्मद इमरान इरफान शेख (२४) यास गुवाहाटीतून अटक करण्यात आली.

चौकशीत आरोपीने चोरी केलेला लॅपटॉप कोलकात्यातील चांदणी मार्केटमध्ये विकल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी लॅपटॉप खरेदी करणारा शेख अफताब अली (३०) यासही अटक करून न्यायालयासमोर हजर केले.

या मोहिमेत एकूण एक लॅपटॉप, मोबाईल फोन आणि एटीएम कार्डे असा सुमारे ₹३५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

या कारवाईस अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपपोलिस आयुक्त सोमय मुंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग यांनी सूचना दिल्या होत्या.

कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक के. बी. डाबेराव, पोलिस अंमलदार बाबा आहेर, किसन शिंगे, गणेश गायकवाड, अतुल इंगळे, गजानन अवातिरक, प्रदीप खरात, प्रितम निकाळजे, शरद राऊत आणि रोहित पाथरुट यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या शिताफीच्या तपासामुळे बाणेर पोलिसांनी केवळ फरार आरोपीला गजाआड केले नाही, तर या घरफोडी प्रकरणातील एक महत्त्वाचा धागाही हाती लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon