करोडोंचा गुटखा जप्त; आठ जणांना अटक; गुन्हे शाखा युनिट ६ ची धडक कारवाई
रवि निषाद / मुंबई
मुंबई : घाटकोपर परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांच्या अपराध शाखा युनिट ६ ने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ₹१ कोटी १४ लाख ६० हजार १५० रुपयांचा गुटखा, चार वाहने, सहा मोबाईल फोन आणि अन्य साहित्य जप्त करत आठ आरोपींना अटक केली आहे.
प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत घोणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, घाटकोपर (पूर्व) कामराज नगर परिसरात काही व्यक्ती मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्यांची नावे मोहम्मद फिरोज कमरू शेख (२६), फैजान नसीम अंसारी (२२) आणि नवाज मेहंदी अंसारी (२६) अशी असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे ₹१३ लाख ४४ हजार ९०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. पुढील चौकशीत त्यांच्या इतर साथीदारांचा ठावठिकाणा लागला.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडी (नारपोली) परिसरात छापा टाकून आणखी ₹७३ लाख ५४ हजार ७०० रुपयांचा गुटखा जप्त केला. अशा प्रकारे एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली असून, सर्वांना न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या कारवाईत पोलिस निरीक्षक सुशांत सावंत, एपीआय मधुकर धुतराज, महिला उपनिरीक्षक रूपाली चौधरी, उपनिरीक्षक संदीप रहाणे आणि त्यांच्या टीमने सक्रिय सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी केली.
पोलिसांच्या या कारवाईमुळे मुंबई परिसरात गुटखा विक्री करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली असून, या नेटवर्कमधील इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.