२००९ च्या कोठडी मृत्यू प्रकरणी २ माजी पोलिसांना ७ वर्षांची शिक्षा
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : घरफोडीच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीच्या २००९ मधील कोठडीतील मृत्यूप्रकरणी दोन माजी पोलिसांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए. व्ही. गुजराती यांनी मंगळवारी हा निर्णय दिला.
घाटकोपर पोलिस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक संजय खेडेकर आणि पोलीस हवालदार रघुनाथ कोळेकर यांना संशयिताला गंभीर दुखापत करणे आणि बेकायदेशीररीत्या बंदिवासात ठेवणे या आरोपांखाली दोषी ठरवण्यात आले. मात्र, न्यायालयाने खुनाच्या गंभीर आरोपातून दोघांची निर्दोष सुटका केली.
दोन्ही आरोपी सध्या जामिनावर असल्याने त्यांना उच्च न्यायालयात अपील करण्याची संधी मिळावी म्हणून न्यायालयाने शिक्षेची अंमलबजावणी ७ नोव्हेंबरपर्यंत स्थगित ठेवली आहे.
या प्रकरणातील तिसरा आरोपी पोलीस कर्मचारी सयाजी ठोंबरे यांचा खटला सुरू असतानाच मृत्यू झाल्याने त्यांच्याविरोधातील कारवाई रद्द करण्यात आली.
प्रकरणाचा तपशील
घरफोडीच्या संशयावरून पोलिसांनी अल्ताफ शेख या तरुणाला ताब्यात घेतले होते. ११ सप्टेंबर २००९ रोजी घाटकोपर पोलिस ठाण्यातच अल्ताफ शेखचा मृतदेह आढळला. शेखच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेत पोलिसांनी मारहाण करून मुलाचा मृत्यू घडवून आणल्याचा आरोप केला होता. न्यायालयाच्या निर्देशानंतर हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग करण्यात आले.
सुमारे १६ वर्षांच्या सुनावणीनंतर अखेर या प्रकरणाचा निकाल लागला असून, कोठडीतील मृत्यूबाबत पोलिस जबाबदारी निश्चित झाल्याचा हा दुर्मिळ निर्णय मानला जात आहे.