११.८० कोटींची बनावट बिलिंग फसवणूक; जीएसटी विभागाची कारवाई, व्यावसायिक अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (जीएसटी) विभागाने बनावट बिलिंगद्वारे महसुलाला फसवणूक करणाऱ्या एका व्यापाऱ्यावर कारवाई करत त्याला अटक केली आहे. मे. ढोलकिया एन्टरप्राइजेस (GSTIN: 27AMBPD1563G1ZG) या कंपनीचे प्रोप्रायटर इब्राहिम असलम ढोलकिया यांना विभागाने ताब्यात घेतले.
जीएसटी विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत या व्यावसायिकाविरुद्ध तपास सुरू करण्यात आला होता. तपासादरम्यान, संबंधित व्यापाऱ्याने चुकीची कर वजावट (Input Tax Credit) घेतल्याचे आणि बनावट बिलांचा (इनव्हॉइस) वापर करून तब्बल ११.८० कोटी रुपयांची महसूल हानी केल्याचे निष्पन्न झाले.
या गंभीर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर विभागाने कारवाई करत ढोलकिया यांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वित्तीय वर्ष २०२५-२६ मधील जीएसटी विभागाकडून झालेली ही २९ वी अटक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विभागाने अशा प्रकारच्या बनावट बिलिंग आणि करचोरीविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.