विष्णूनगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी! CEIR पोर्टलद्वारे २.४३ लाखांचे २० हरवलेले मोबाईल शोधण्यात यश
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने ‘CEIR’ (Central Equipment Identity Register) पोर्टलचा प्रभावी वापर करून तब्बल ₹२.४३ लाख किंमतीचे २० हरवलेले मोबाईल शोधण्यात यश मिळवले आहे. त्यापैकी ₹१.५० लाख किंमतीचे १२ मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले असून उर्वरित मोबाईल लवकरच त्यांच्या मालकांना सुपूर्द केले जाणार आहेत.
हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विष्णूनगर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि CEIR पोर्टलवरील माहितीचा उपयोग करून ही कामगिरी केली. संबंधित मोबाईलचे आयएमईआय क्रमांक ट्रॅक करत तपास केल्यानंतर विविध ठिकाणांहून हे फोन हस्तगत करण्यात आले.
या कार्यवाहीत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पथकाने मोलाची भूमिका बजावली. नागरिकांच्या तक्रारींवर तत्परतेने प्रतिसाद देत मोबाईल परत केल्याबद्दल पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.