इराणी वस्तीतील चैनस्नेचिंग आणि जबरी चोरी करणारा सलमान ‘ड्राणी’ अखेर जेरबंद!

Spread the love

इराणी वस्तीतील चैनस्नेचिंग आणि जबरी चोरी करणारा सलमान ‘ड्राणी’ अखेर जेरबंद!

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण – परिमंडळ ३ कल्याण अंतर्गत खडकपाडा पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने इराणी वस्ती परिसरात जबरी चोरी आणि चैनस्नेचिंगच्या गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या सराईत आरोपीला अखेर गजाआड करण्यात यश मिळवलं आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव सलमान साजिद जाफरी उर्फ ड्राणी (वय २२, रा. इराणी वस्ती, आंबिवली, कल्याण पश्चिम) असं आहे. या आरोपीविरुद्ध कल्याणसह बदलापूर, कापुरबावडी, मुंब्रा, अंधेरी एमआयडीसी, वालीव, तुर्भे आदी विविध पोलिस ठाण्यांत तब्बल १० जबरी चोरी आणि चैनस्नेचिंगचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय सहार, भिवंडी, निजामपूरा, खारघर आणि कामोठे पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या प्रकरणांत तो वॉन्टेड होता.

पनवेल शहर पोलिस ठाण्यात गु. र. क्र. ५८१/२०२५ भा.दं.वि. कलम ३०९(४), ३(५) अन्वये गुन्हा नोंद असून त्यानंतर सलमान ड्राणी फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पनवेल पोलिस खडकपाडा पोलिस ठाण्याच्या संपर्कात आले असता, परिमंडळ ३ चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांनी विशेष पथकाला शोध मोहीमेचे आदेश दिले.

यानुसार ३ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, खडकपाडा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने आंबिवली रेल्वे स्टेशनजवळ सापळा रचला. त्यावेळी सलमान ड्राणी दिसताच पोलिसांनी शिताफीने घेराबंदी करत त्याला पकडले. त्याचे नातेवाईक आणि परिचितांनी पोलिस कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी धैर्य आणि संयम राखत आरोपीला ताब्यात घेतले. नंतर त्याला पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, परिमंडळ ३ पोलीस उपायुक्त अतुल झेंडे व सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे, निरीक्षक (गुन्हे) मारुती आंधळे, सपोनि विजय गायकवाड, पो.उपनि. विजय भालेराव, तसेच राजू लोखंडे, योगेश बुधकर, संदीप भोईर, ललित शिंदे, महेश बगाड आणि सुरज खडाळे यांनी मोलाची भूमिका बजावली.

खडकपाडा पोलिसांचे हे अजून एक यशस्वी ऑपरेशन असून परिसरात वाढत्या चैनस्नेचिंगप्रकरणांना आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon