गाडीला कट मारल्याच्या वादातून पुण्यात दोन तरुणांकडून पोलिसावरच कोयत्याने वार; पोलिस अधिकारी सह्याद्री रुग्णालयात उपचाराधीन

Spread the love

गाडीला कट मारल्याच्या वादातून पुण्यात दोन तरुणांकडून पोलिसावरच कोयत्याने वार; पोलिस अधिकारी सह्याद्री रुग्णालयात उपचाराधीन

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – पुणे शहराच्या हद्दीत दिवसागणिक होणारे खून, मारामाऱ्या या घटनांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना आता शहरात पोलिसांवरच हल्ले होऊ लागले असून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ३ मध्ये कार्यरत असलेल्या अमोल काटकर या पोलीस अधिकाऱ्यावर शनिवारी मध्यरात्री कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार लॉ कॉलेज रोडवर घडला असून, काटकर सध्या सह्याद्री रुग्णालयात उपचाराधीन आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास, पुण्यातील गुन्हे शाखेतील अधिकारी अमोल काटकर हे ड्युटी संपवून आपल्या घरी जात होते. त्यावेळी लॉ कॉलेज रोड परिसरात बाईकवरून आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी अमोल काटकर यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला असून या हल्ल्यात काटकर गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात काही वेळ दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

पोलीस अधिकारी अमोल काटकर यांच्यावर झालेला हा हल्ला गाडीला कट मारल्याच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. वाहन चालवताना झालेल्या किरकोळ वादानंतर हल्लेखोरांनी आक्रमक होत कोयत्याने वार केल्याचे सांगितले जात आहे. काटकर यांच्यावर हल्ल्याची माहिती मिळताच जवळील पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि काटकर यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या ते सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास डेहूरोड पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट ३ करत आहे. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून लवकरच आरोपींना बेड्या ठोकण्यात येतील, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon