आयपीएस अधिकारी असल्याचं सांगून १७ हजार रुपयांचा माल फुकट घेऊन पसार झालेल्या मायलेकींनां बेड्या
पुणे – पुण्यातील एम. जी. रोडवरील नामांकित चप्पल दुकानात दोन मायलेकींनी आयपीएस अधिकारी असल्याचं सांगून तब्बल १७ हजार रुपयांचा माल फुकट घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. बनावट ओळखपत्र दाखवून दुकानात विश्वास संपादन करणाऱ्या या दोघींना अखेर लष्कर पोलिसांनी गजाआड केलं आहे.
मिनाज मुर्तजा शेख (४०) आणि तिची मुलगी रिबा मुर्तजा शेख (१९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी मायलेकींची नावे आहेत. या दोघींविरोधात यापूर्वी कोंढवा पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल असल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.
१३ सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास आरोपी मिनाज शेख आणि तिची मुलगी रिबा एम. जी. रोडवरील एका नामांकित चप्पल दुकानात गेल्या. मिनाजने स्वतःला आयपीएस अधिकारी म्हणून ओळख दिली आणि दुकानातील कर्मचाऱ्यांना बनावट ओळखपत्र दाखवलं. त्यानंतर तिने घरात लग्नाचा कार्यक्रम असल्याचं सांगत मोठ्या प्रमाणावर चप्पल आणि बुट खरेदी करण्यास सुरुवात केली.
संपूर्ण खरेदी झाल्यानंतर तिने दुकानातील एका कामगाराला ‘पैसे देण्यासाठी कमिश्नर ऑफिसला चल’ असं सांगत दोघींनी तिथून पळ काढला. पैसे न देता त्यांनी तब्बल १७ हजार रुपयांचा माल घेऊन पलायन केलं.
घटनेनंतर दुकानदाराने तत्काळ लष्कर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. फुटेजमध्ये आरोपी मायलेकींच्या हालचाली स्पष्टपणे दिसून आल्या. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सूत्रांच्या मदतीने दोघींना शोधून काढलं.१ आणि २ ऑक्टोबर रोजी लष्कर पोलिसांनी दोघींना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासादरम्यान या दोघींनी यापूर्वीही अशा प्रकारच्या फसवणुक केल्याचे समोर आले आहे.