मुख्याध्यापिकेकडून विद्यार्थिनीचा अपमान, दहावीच्या मुलीचं टोकाचं पाऊल; मुख्याध्यापिका देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – ऐरोलीतील सुशिलाबाई देशमुख विद्यालयात दहावीत शिकणारी अनुष्का शहाजी केवळे या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. परीक्षेदरम्यान कॉपीसंदर्भात शाळेतील मुख्याध्यापिका देशमुख मॅडम यांनी सार्वजनिकपणे केलेल्या अपमानामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. अनुष्काच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात मुख्याध्यापिका देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी शाळेत परीक्षेचे पेपर सुरू असताना अनुष्काच्या बेंचखाली कॉपीची एक चिठ्ठी आढळून आली. यावरून मुख्याध्यापिकांनी तिला सर्व विद्यार्थ्यांसमोर अपशब्द वापरत अपमानित केले, असे पालकांचे म्हणणे आहे. या प्रकाराने मानसिक तणावात गेलेल्या अनुष्काने घरी आल्यानंतर आत्महत्या केली.
या घटनेची गंभीर दखल घेत रबाळे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुख्याध्यापिका देशमुख मॅडम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थी व पालक वर्गात संतापाची लाट उसळली असून मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.