चेंबूरमध्ये गुन्हे शाखेची धडक कारवाई; जुगार अड्ड्यावर ३३ जणांना अटक, साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त
मुंबई – गुन्हे शाखेने चेंबूर (पूर्व) येथील वसंतविहार कमर्शियल कॉम्प्लेक्समधील रूम क्रमांक ३०६/३०७ येथे सुरू असलेल्या भव्य जुगार अड्ड्यावर शनिवारी रात्री छापा टाकून मोठी कारवाई केली.
गुप्त माहितीच्या आधारे कक्ष-८ व गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने छापा मारला असता, अड्डा चालक, कॅशिअर, सात आयोजक आणि २४ खेळाडू असे एकूण ३३ जण जुगार खेळताना आढळले.
या कारवाईत रोख रक्कम ₹१.५० लाख, जुगार साहित्य तब्बल ₹३.३० कोटी, पीओएस मशीन ₹५ हजार, तसेच विदेशी दारू ₹१० हजार असा एकूण ₹३.३१ कोटी ६६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास कक्ष-८ चे सपोनि संग्राम पाटील करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई) श्री. देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) श्री. राज तिलक रौशन, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-विशेष) श्री. किशोर शिंदे, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पश्चिम) श्री. प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यात प्र.पो.नि. काठे, पो.नि. लोणकर, मसपोनि निकम, पोउनि साबळे, पोउनि कुरेशी, पोह. पाटील, पोह. बंगाले, पोह. चौधरी, पोशि. गावडे, पोशि. उथळे, पोशि. गायकर, तसेच विशेष कार्य पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या धडक कारवाईमुळे परिसरातील बेकायदा जुगार अड्ड्यांना मोठा धक्का बसला असून पुढील तपास सुरू आहे.