खुनाचा प्रयत्न आणि बलात्कार प्रकरणात आरोपींना शिक्षा; पोलिसांच्या दक्ष तपासामुळे न्याय मिळाला
रवि निषाद / मुंबई
मुंबई – परिमंडल ६ अंतर्गत दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने आरोपींना कठोर शिक्षा सुनावली आहे. खुनाचा प्रयत्न आणि बलात्कार प्रकरणातील दोन्ही खटल्यांमध्ये पोलिसांनी सादर केलेल्या सबळ पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
देवनार प्रकरण :
८ वर्षांची शिक्षा
देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७९/२०२१ कलम ३०७, ३४, १२० (ब) भा.दं.वि., तसेच शस्त्र कायद्यांतर्गत दाखल खटल्याची सुनावणी मुंबईच्या १९व्या सत्र न्यायालयात झाली. तपासादरम्यान पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांनुसार आरोपी आकाश विद्याधर डावरे आणि विकास फूलचंद्र जैसवार यांना न्यायालयाने दोषी ठरवत ८ वर्षे सश्रम कारावास आणि ३५,००० रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त १ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात तपास अधिकारी पीएसआय सुपे, पीआय हरिभाऊ बानकर, कोर्ट पेरवी अधिकारी सुनील सूर्यवंशी, महिला पोलीस कर्मी कदम, शिपाई ईश्वरकर आणि लोंढे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कार्याची पोलिस उपायुक्त समीर शेख यांनी विशेष दखल घेत प्रशंसा केली.
चेंबूर प्रकरण :
१० वर्षांची शिक्षा
दरम्यान, चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२०/२०२१ अंतर्गत कलम ३६३, ३७६, ३७६(२)(एन), ५०६ भा.दं.वि. आणि पोक्सो कायद्यान्वये दाखल प्रकरणात आरोपी सुभम अशोक तायडे (२२) याला न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास आणि ५,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिन्यांचा कारावास ठोठावण्यात आला.
या खटल्यात महिला पीएसआय शीतल कदम, एपीआय ललित दलवी, पेरवी अधिकारी पीएसआय संजय कुंभार यांच्या टीमने सबळ पुरावे न्यायालयात सादर केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने उत्कृष्ट कामगिरी केली.
न्यायालयीन निकालांमुळे गुन्हेगारांना मिळालेला कठोर धडा आणि पोलिसांची तपासातील तत्परता यांची उल्हासनगर, देवनार व चेंबूर परिसरात व्यापक चर्चा सुरू आहे.