कारवाई की संगनमत? रिकीज बारसमोरील अनधिकृत शेडला अधिकाऱ्यांचे छत्रछाया; कायद्याचे राज्य की बारचा दरबार?
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – ठाणे महापालिका एकीकडे आकडे झोडत अनधिकृत बांधकामांवर गाजावाजा करते, पण दुसरीकडे रिकीज बार अँड किचन समोरील अनधिकृत शेडवर मात्र कारवाईचा हात थरथर कापतो. या शेडमध्ये खुलेआम मद्यप्राशन, नाचगाणी व अश्लील हावभाव सुरू असूनही प्रशासनाचे मौन हे केवळ संगनमताचा वास देत आहे.
पाठपुरावा तरीही कारवाई नाही!
दैनिक पोलीस महानगर सातत्याने या प्रकरणी पाठपुरावा करत आहे. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे, परिमंडळ ३ चे उपायुक्त दिनेश तायडे आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त सोनल काळे यांच्या लक्षात वारंवार आणूनही कारवाई शून्य. मग प्रश्न उभा राहतो – या शेडला संरक्षण कोणाचे?
गरीबांवर गदा, बारमालकांवर माया?
महापालिका सांगते की, जूनपासून २६४ अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली, १९८ पाडले गेले, ५० गुन्हे दाखल झाले. पण नागरिकांचा संताप असा की –
“गरिबाने झोपडीला दोन वीटा लावल्या तरी महापालिका येऊन जमीनदोस्त करते, पण बारसमोरील शेड मात्र सुरक्षित राहते. अधिकारी कायद्याचे पालन करतात की बारमालकांचे पालन?”
अधिकारी जनतेसाठी की रिकीज बार अँड किचनच्या मालकासाठी? नागरिकांचा संताप
“ही निवडक कारवाई म्हणजे थेट भ्रष्टाचाराला प्रोत्साहन आहे.”
“कायद्याचा धाक दाखवला जातो तो फक्त कमकुवतांवर.”
“बारसमोरचे शेड वाचवण्यासाठी अधिकारी गप्प बसतात म्हणजेच संगनमताशिवाय हे शक्यच नाही.”
सरळ सवाल
महापालिकेची कारवाई खरंच सर्वांसाठी आहे का फक्त ‘निवडक’?
कायदा खरोखर समान आहे का पैसा व दबावावर अवलंबून?
आणि जर रिकीज बारसमोरील शेड पाडण्याची हिंमत नसली, तर बाकीच्या मोहिमेची ढोंगी मिरवणूक कोण पचवणार?
नागरिकांनी ठणकावून प्रश्न केला आहे की, “ठाणे महापालिका शहराचा कायदा राबवते की बारचा दरबार चालवते?”