ठाण्यात २६४ अनधिकृत बांधकामांवर कारवाई; ५० गुन्हे दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत २६४ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून, त्यापैकी १९८ बांधकामे पूर्णपणे पाडण्यात आली, तर ६६ ठिकाणी वाढीव अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले. याशिवाय विविध प्रभागांत एकूण ५० गुन्हे एमआरटीपी कायद्यानुसार दाखल करण्यात आले आहेत.
शनिवारी (२७ सप्टेंबर) झालेल्या आढावा बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित विभागांना कठोर निर्देश दिले. “अनधिकृत बांधकामे सुरू राहू नयेत यासाठी प्रत्येक यंत्रणेने सतर्क राहावे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तातडीने गुन्हे दाखल करावेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अचूक माहिती संकलित करून कारवाई करावी,” असे निर्देश आयुक्तांनी दिले.
त्यांनी पुढे सांगितले की, ज्या बांधकामांचे पाडकाम शिल्लक असेल त्यांचे प्रवेशमार्ग पाडून पत्रे लावून बंद करण्यात यावेत. तसेच नागरिकांनी अनधिकृत घरांची खरेदी करू नये यासाठी मोक्याच्या ठिकाणी चेतावणी फलक लावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
महापालिकेने अधिकृत बांधकामांवर पारदर्शकता ठेवण्यासाठी क्यूआर कोड प्रणाली लागू केली आहे. नागरिकांनी तो स्कॅन करून बांधकामाला मिळालेली परवानगी सहज तपासता येईल, अशी माहितीही आयुक्त राव यांनी दिली.
गुन्हे दाखल प्रकरणांची आकडेवारी (जून–सप्टेंबर २०२५)
नौपाडा-कोपरी : ०१
दिवा : ११
मुंब्रा : १३
कळवा : ०४
उथळसर : ०१
माजिवडा-मानपाडा : ०५
वर्तक नगर : ०८
लोकमान्य नगर-सावरकर नगर : ०७
एकूण : ५० गुन्हे
ठाण्यातील अनधिकृत चाळी, बैठी बांधकामे, शेड, वाढीव बांधकाम, प्लिंथ व टर्फ यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असून पुढील काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.