मनोर पोलिस ठाण्याचे माजी प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा; पीडितेवरही खंडणीचा गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पालघर : पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याचे माजी प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र घटनेचे ठिकाण मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने पुढील तपासासाठी तो गुन्हा मनोर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२३ ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान संबंधित महिलेचे लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा शारीरिक संबंध ठेवण्यात आले. या संबंधांपैकी काही घटना पालघरच्या मनोर परिसरात तसेच मुंबईतील जोगेश्वरी येथील हॉटेलमध्ये घडल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. दराडे यांच्यावर भारतीय न्याय दंड संहिता २०२३ अंतर्गत कलम ६९, ३५२, ३५१ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान, त्याच महिलेविरोधातही खंडणी मागितल्याप्रकरणी अहिल्यानगरच्या कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दराडे यांनी आरोप केला आहे की, पीडित महिलेने त्यांच्याकडे तब्बल २ कोटी रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्याने खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात महिलेविरोधात भारतीय न्याय दंड संहिता कलम ३०८(२), ३०८(६) आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास अधिकारी प्रभा राऊळ यांनी सांगितले की, सदर गुन्ह्याची कागदपत्रे प्राप्त झाली असून, समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे तपास योग्य पद्धतीने केला जाईल. हनीट्रॅप प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.