चारकोपमध्ये पितृहत्येचा थरार! पोटच्या मुलानेच जन्मदात्याचा खून करण्यासाठी दिली ६.५ लाखांची सुपारी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : चारकोप परिसरात बाप–लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी थरारक घटना उघड झाली आहे. काचेच्या व्यापारात असलेले ६५ वर्षीय अयूब सैय्यद यांचा खून त्यांच्या धाकट्या मुलानेच सुपारी देऊन केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
रविवारी अयूब सैय्यद आपल्या ऑफिसमधील केबिनमध्ये बसले असताना धारदार शस्त्रांनी सज्ज दोन गुंडांनी थेट आत प्रवेश करून त्यांच्यावर ३० वेळा चाकूने वार केले. जागीच त्यांचा मृत्यू झाला. या निर्घृण हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली.
चारकोप पोलिसांच्या तपासात उघडकीस आले की, ही हत्या अयूब यांचा धाकटा मुलगा हनीफ सैय्यद यानेच रचलेल्या कटाचा भाग होता. हनीफने सानू चौधरी या परिचितासोबत मिळून योजना आखली आणि गोवंडीतील दोन तरुणांना तब्बल ६.५ लाख रुपयांची सुपारी देऊन वडिलांची हत्या घडवून आणली.
यामागील कारणही तितकेच धक्कादायक आहे. वडील दुकान विकून टाकतील, कामाची जबाबदारी देणार नाहीत, तसेच इतरांवर कोट्यवधी रुपये खर्च करतात पण स्वतःकडे दुर्लक्ष करतात या नाराजीमुळे हनीफनेच आपल्या पित्याच्या खुनाचा कट रचला.
या प्रकरणात पोलिसांनी हनीफ सैय्यदसह तिघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. पुढील तपास सुरू आहे. मुलानेच जन्मदात्याचा बळी देत बाप–लेकाच्या नात्याला काळीमा फासल्याने समाजात संताप व्यक्त होत आहे.