भिवंडीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक; ४ किलो गांजा आणि अवैध पिस्तुल जप्त
भिवंडी : भिवंडी गुन्हे शाखा घटक-२ च्या पथकाने १७ सप्टेंबर २०२५ रोजी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन इसमांना अटक केली. या कारवाईत ४ किलो ८२७ ग्रॅम गांजा, यामाहा फसिनो स्कूटर आणि एकूण ₹३.५४ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक केलेले आरोपी:
प्रशांत उर्फ सलाड सुरेश तायडे (वय २७, रा. टिटवाळा, जि. ठाणे)
सोहेल उर्फ पित्तल इरफान अली अन्सारी (वय २०, रा. भिवंडी)
या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान, आरोपी प्रशांत तायडे यांच्या घरझडतीत अवैध माऊझर पिस्तुल व एक जिवंत काडतूस सापडला. यासह एकूण ₹३.८५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींना २४ सप्टेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास गुन्हे शाखा घटक-२, भिवंडीमार्फत सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शोध-१) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्यासह पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली असल्याची माहिती शैलेश साळवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी, ठाणे शहर पोलीस आयुक्तालय यांनी सांगितले.