ट्रेड विथ जॅझ घोटाळा! जादा परताव्याच्या अमिषाला बळी पडून कोट्यवधींची फसवणूक; चिपळूण व यवतमाळमध्ये गुन्हा दाखल

Spread the love

ट्रेड विथ जॅझ घोटाळा! जादा परताव्याच्या अमिषाला बळी पडून कोट्यवधींची फसवणूक; चिपळूण व यवतमाळमध्ये गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क 

रत्नागिरी – पुन्हा एकदा जादा परताव्याच्या आमिषाने हजारो गुंतवणूकदारांची घोर फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ट्रेड विथ जॅझ कंपनीकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्यामुळे गुंतवणूकदार संतप्त झाले असून, राज्यातील विविध ठिकाणी कंपनीविरोधात गुन्हे दाखल होत आहेत.

चिपळूणमध्ये गुन्हा दाखल

गुंतवणूकदार पंकज माटे यांच्या तक्रारीनंतर चिपळूण पोलिसांत समीर नार्वेकर (मुख्य व्यवस्थापकीय संचालक), त्यांची पत्नी नेहा नार्वेकर, तसेच शाखा व्यवस्थापक संकेश घाग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या या कंपनीत सुमारे ११ हजार गुंतवणूकदार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यभरात कंपनीच्या जवळपास २० शाखा कार्यरत होत्या. गुंतवणूकदारांना महिन्याला ३ ते ५ टक्के व्याजदर परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सुरुवातीला काही महिन्यांपर्यंत व्याज दिले गेले. मात्र, मागील ५ महिन्यांपासून व्याज न दिल्यामुळे गुंतवणूकदार बेजार झाले. लाखो-कोट्यवधींची गुंतवणूक अडकून पडली आहे.

यवतमाळमध्ये ३ कोटींची फसवणूक

यवतमाळमधील जांब रोड येथील ट्रेड विथ जॅझ फ्रँचाईस बिझनेस अग्रीमेंट कंपनीनेही अशाच प्रकारे ग्राहकांची फसवणूक केली. गजेंद्र श्रावणजी गणवीर (वय ५५, रा. अंबिका नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे २९ लाख रुपये, तसेच इतर गुंतवणूकदारांचे मिळून तब्बल ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

२ सप्टेंबर २०२५ रोजी यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस ठाण्यात समीर नार्वेकर, मुख्य व्यवस्थापकीय संचालक, पुणे), सागर मयलवार (शाखा व्यवस्थापक, यवतमाळ), सुरज माडगुलवार (लेखापाल, यवतमाळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१८(४), ३(५), तसेच कलम ३, ४ अंतर्गत कारवाई सुरू आहे.

राज्यभर गुंतवणूकदार आक्रमक

मुंबईच्या दादर येथील टॉरेस घोटाळ्यानंतर आता हा ट्रेड विथ जॅझ घोटाळा उघड झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असून, फसवणुकीचा आकडा राज्यभरात कितीपर्यंत पोहोचतो हे समोर येणे बाकी आहे. गुंतवणूकदारांनी पोलिस ठाण्यांवर धाव घेत कंपनीविरोधात तक्रारी नोंदवायला सुरुवात केली असून, आपल्या मेहनतीच्या पैशाची भरपाई मिळावी, यासाठी ते आक्रमक झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon