हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका! शिर्डी साई संस्थान समितीच्या नियुक्तीला स्थगिती
योगेश पांडे – वार्ताहर
अहिल्यानगर – शिर्डी साई संस्थान समितीप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दणका दिला असून सरकारकडून नेमण्यात येणाऱ्या सहा सदस्यीय समितीच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा शासनाचा प्रस्ताव होता. मात्र सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने या नियुक्तीला आक्षेप घेत स्थगिती आदेश दिला.
देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी साई संस्थानचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी सरकारने ही समिती नेमण्याचा प्रयत्न केला होता. समितीत जिल्हाधिकारी, आमदार, नगराध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश होणार होता. पण सुनावणीत संस्थाननेच प्रस्ताव माघारी घेतल्याने राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे.
आता आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानवर विश्वस्त मंडळ स्थापन होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.