चिखली परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या रावण टोळीतील गुंडांना अटक; चार पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुणे शहर आणि परिसरात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ही गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस एक्शन मोडवर आले असून चिखली परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या रावण टोळीतील गुंडांच्या मुसक्या अखेर पोलिसांनी आवळल्या आहेत. गुंडाविरोधी पथकाने टाकलेल्या या धाडीत पोलिसांच्या हाती चार पिस्तुले, तीन जिवंत काडतुसे आणि आधी वापरलेले एक काडतूस लागले. या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुासर, अटक केलेल्यांमध्ये अनिकेत अशोक बाराथे, अश्विन सुधीर गायकवाड आणि यशपाल सिंग अरविंदसिंग देवडा या तिघा सराईतांचा समावेश आहे. याशिवाय दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही टोळी चिखली येथील पाटील नगरमधील एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा डाव आखत होती. त्यासाठी टोळीने शस्त्रसज्ज होऊन तयारी केली होती.
दरम्यान, गुन्हेगारांकडे शस्त्र असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला गुप्त सूत्रांमार्फत मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने काही दिवसांपासून या टोळीवर बारीक नजर ठेवली होती. योग्य वेळी सापळा रचून सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सर्व आरोपींना पकडण्यात आले.
तपासादरम्यान एका आरोपीकडे पिस्तुल आढळले, त्यानंतर उर्वरित आरोपींकडून आणखी तीन पिस्तुले व काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपींवर चिखली पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या देखरेखीखाली पार पडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे आणि गुंडाविरोधी पथक प्रमुख हरीश माने यांच्या पथकाने हा डाव उधळून लावला.या कारवाईमुळे रावण टोळीचा आणखी एक कट उघड झाला असून पोलिसांच्या दक्षतेमुळे मोठी घटना टळली आहे.