कोतवाली पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल; लग्नाचं आमिष देऊन वारंवार शारीरिक संबंध
योगेश पांडे / वार्ताहर
अहिल्यानगर : ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रिदवाक्य घेऊन नागरिकांच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या पोलिस यंत्रणेची प्रतिष्ठा पुन्हा एकदा डागाळली आहे. अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. तोफखाना पोलिस ठाण्यात हा गुन्हा शून्य क्रमांकानं नोंदवून पुढील कार्यवाहीसाठी पालघर जिल्ह्यातील मनोरा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेने आपल्या तक्रारीत केलेल्या धक्कादायक आरोप करत म्हटले आहे की, ‘सन २०२३ ते २०२४ या कालावधीत दराडे यांनी लग्नाचं आमिष दाखवत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या कालावधीत मनोर (पालघर) येथील एका फॉर्महाऊसवर तसेच मुंबईतील जोगेश्वरी (पश्चिम) येथील ठिकाणी वारंवार अत्याचार झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. फिर्यादीत असंही नमूद आहे की, ‘सुरुवातीला लग्नाचं आश्वासन देण्यात आलं. मात्र, नंतर अचानक लग्नास नकार दिला, आणि केवळ शिवीगाळच केली नाही तर, जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली’. त्यामुळे त्रस्त होऊन अखेर पीडितेने कायद्याचा दरवाजा ठोठावला आहे.
या धक्कादायक घटनेमुळे अहिल्यानगर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांतही संतापाचं वातावरण असून, सामान्य नागरिकांचं रक्षण करण्याची शपथ घेतलेल्या अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल होण्याची मालिका वाढत असल्याने पोलिस दलाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही याच कोतवाली पोलिस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा एकदा अशा स्वरूपाचा गंभीर गुन्हा नोंदवल्यानं नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणाची चौकशी पालघर जिल्ह्यातील मनोरा पोलिस ठाण्याकडून सुरू असून, आरोपी पोलिस निरीक्षकाविरुद्ध पुढील कठोर कारवाईची मागणी होत आहे.