आयुर्वेदिक सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; स्वारगेट पोलिसांची धडक कारवाई, पीडित महिलेची सुटका
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : मुकुंदनगर, गुलटेकडी परिसरातील “दिया आयुर्वेदीक सेंटर”च्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक विभागाने कारवाई करत छापा टाकला. या कारवाईतून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, सेंटरची मालक व मॅनेजर कविता आनंद शिंदे (वय ३८, रा. पुणे) हिच्याविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने पोलिस उपनिरीक्षक विशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकला. या पथकात कर्मचारी तुषार भिवरकर, ईश्वर आंधळे, अजय राणे, किशोर भुजबळ व महिला पोलिस कर्मचारी वैशाली खेडेकर यांचा समावेश होता.
या प्रकरणी पोलिस हवालदार इमानखान नदाफ यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास स्वारगेट पोलिस ठाण्यात सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शहरात विविध स्पा व मसाज सेंटरच्या आडून अशा बेकायदेशीर कृती सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांना वेळोवेळी माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आरोग्यसेवेच्या आडून वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी नागरी समाजाकडून होत आहे.